मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

Weather Update : नागरिकांनो काळजी घ्या, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांत देशातील हवामानात मोठा बदल झालेल्या पाहायला मिळतेय. एकीकडे राज्यात मान्सून दाखल झाला असाल तरी त्याने राज्य व्यापलं नाहीय. त्यातच जून महिना अर्धा संपला तरी उष्णतेची दाहकता कमी होताना दिसत नाही आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत. अशातच हवामान खात्याने पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

जूनचा दुसरा आठवडा ओलांडला असून अद्यापही राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळं विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी वाढलं आहे. विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं नागपूर हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे

जळगावातील तापमान
सध्या जळगावात ऊन सावलीचा खेळ सुरूय. ढगाळ वातावरणामुळे जळगावातील तापमान ४१ अंशावर आहे. गेल्या दोन दिवसापासून वाऱ्यामुळे उष्णता कमी जाणवत आहे. आज दिवसभर सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान, बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मॅान्सूनवर परिणाम झाला आहे. मॅान्सून लांबल्याने खरीप पेरणीचं नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सूनने अद्यापही जोरदार हजेरी लावली नाहीय. त्यामुळे आणखी काही दिवस मान्सूनची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करु नये
दरवर्षी मृग नक्षत्रामध्ये पेरणीला सुरुवात होत असते, परंतु यावर्षी अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत. राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सूनने हजेरी लावली असली तरीही अजून शेतीसाठी पुरक असा पाऊस राज्यात बरसला नाही. हवामान खात्याने देखील जोपर्यंत 50 ते 60 टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.