जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपून काढलं असून यामुळे शेतीपिकांचे मोठं नुकसान झाले आहे. यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात पुढील आठवड्यात वादळी वारे आणि बेमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनधारकांनी सावध राहून आपली जनावरे सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत जनावरांसाठी सुरक्षित निवारा (शेड/गोठा) उपलब्ध करून देण्यात यावा. निवाऱ्याला पावसाचे पाणी किंवा जोरदार वाऱ्याचा धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. जनावरे मोकळ्या जागेत किंवा झाडांखाली बांधू नयेत. धोकादायक वृक्षांची छाटणी करून संभाव्य धोका टाळावा.
अतिवृष्टीमुळे नदीपात्र किंवा साचलेल्या पाण्याजवळ जनावरे नेऊ नयेत. विजेच्या खांबांजवळ किंवा डि.पी.च्या आसपास ओल्या जागी पशुधन ठेवू नये. गोठ्यांमध्ये विजेच्या तारांची सुरक्षितता तपासावी. शॉर्टसर्किटचा धोका टाळावा.
प्राण्यांना पुरेसे अन्न-पाणी उपलब्ध करून द्यावे. आजार किंवा जखम झाल्यास जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी तातडीने संपर्क साधावा. आपत्तीत मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट नद्यांत न करता शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीत पुरून करावी. पोल्ट्रीपालकांनी पक्षीगृहात पावसाचे पाणी शिरणार नाही याची दक्षता घ्यावी. पक्षीगृहातील आर्द्रता कमी ठेवावी. पक्ष्यांचे खाद्य ओलावल्यास बुरशी येऊ शकते.
अशा खाद्याचा वापर टाळावा. आजारी पक्ष्यांवर त्वरीत उपचार करावेत. मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करावी.पशुधनधारकांनी व पोल्ट्री व्यवसायिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून पशुधनाचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.