धक्कादायक : जिल्ह्यात ४ वर्षात तब्बल ३ हजार आत्महत्या, महिलांचे प्रमाण नगण्य
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । जळगाव जिल्हा पोलीस दल आणि श्री संतुलन कौन्सिलिंग सेंटरतर्फे जिल्ह्यातील आत्महत्या करणाऱ्यांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता ते चिंताजनक आहे. गेल्या ४ वर्षात तब्बल २९७५ नागरिकांनी आत्महत्या केली आहे. त्यात तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नैराश्यात असलेल्यांना मानसिक आधार देत जागरूक करणे आवश्यक असल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
जळगाव जिल्हा पोलीस दल आणि श्री संतुलन कौन्सिलिंग सेंटरतर्फे जिल्ह्यातील आत्महत्या करणाऱ्यांच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला होता. यासाठी मु.जे.महाविद्यालयाचे डॉ.बालाजी राऊत आणि आयएमआर महाविद्यालयाचे घनश्याम रामटेके यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. प्रसंगी डॉ.रागीब अहमद उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये तरुणवर्गाचे प्रमाण सर्वात जास्त आढळलेले आहे. २०१८ ते २०२१ या कालावधीत २९७५ आत्महत्या नोंदवण्यात आल्या. त्यात पाण्यात बुडून, उंचावरून उडी घेऊन, रेल्वेखाली, विषप्राशन करून, जाळून घेत, गळफास घेऊन, धावत्या मोटार वाहनाखाली व अन्य प्रकार त्यात नस कापून घेणे अशा नोंदी आहे. या सर्वांमध्ये विविध गटांचा अभ्यास करण्यात आला.
आत्महत्यांचे वर्गीकरण करताना अग्रेशन म्हणजे रागाच्या भरात व्यसनाधीनतेमुळे शारीरिक आजाराला कंटाळून, कर्जबाजारी झाल्यामुळे, आर्थिक अडचणीमुळे मानसिक आजारामुळे, डिप्रेशन म्हणजे नैराश्यामुळे, कौटुंबिक संघर्षामुळे, लग्न जमत नसल्यामुळे, अस्पष्ट कारणामुळे व अनैसर्गिक मृत्यू अशा वर्गीकरण करण्यात आलेले आहे. सगळ्यात कमी ११ वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या आहे. १६४ आत्महत्या या १८ वर्षाखालील बालकांच्या आहेत त्यात मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असून सर्वात जास्त ९१ वर्षाच्या वयोवृद्धाने ही आत्महत्या केलेली आहे.
जिल्ह्यात सन २०१८ मध्ये ६९०, २०१९ मध्ये ७१८, २०२० मध्ये ८१८ तर २०२१ मध्ये ७४९ नागरिकांनी आत्महत्या केली. जिल्ह्यात एकूण २१७५ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. समाजाला चिंतेत टाकणारी बाब म्हणजे अत्यंत तरुण वयात म्हणजे वय वर्ष ३१ते ४५ या कालावधीत एकूण ११०७ एवढ्या आत्महत्या या वयोगटातील आहे. १ ते १८ वयोगटात १६४, १९ ते ३० वयोगटात ९९५, ३१ ते ४५ वयोगटात ११०७, ४६ ते ६० वयोगटात ४८९, ६१ ते ८० वयोगटात २०७ आणि ८१ ते १०० वयोगटात १३ जणांनी आत्महत्या केली आहे.
आकडेवारी आणि कारणांचा अभ्यास केला असता व्यसनाधीनतेमुळे रागाच्या भरात डिप्रेशनमध्ये आत्महत्या केलेल्याचे प्रमाण जास्त आहे. समाजातील मानसिक आजाराबद्दलची समाजाची असलेली नकारात्मक विचारसरणी व तरुणांचा व्यसनाकडे वाढणारा कल हा पुढच्या पिढीसाठी धोक्याच्या घंटा आहेत. डिप्रेशन व मानसिक आजार हे योग्य वेळी औषधोपचार घेतल्याने बरे होतात. तसेच व्यसनांवर ही उपचार उपलब्ध आहे परंतु या दोन्ही गोष्टींना असलेला स्तीगमा आत्महत्येस हातभार लावत आहे. मानसिक आजाराबद्दल समाजात जाणीव जागृती निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.
जगभरात दरवर्षी ७ लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. पण त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण एक भयानक स्वरूप घेत आहे. हे जर का थांबवायचे असेल तर सर्वांना या संदर्भात काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. आत्महत्येमागे नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते. यामागे वैद्यकीय कारणंही असतात. एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणे याला मानसोपचारतज्ज्ञ सुसाईड आयडिएशन म्हणतात. मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारण कारणीभूत नसतं, आत्महत्येसारखं टोकाच पाऊल उचलण्याआधी घडलेली घटना निमित्तमात्र असू शकते. त्याक्षणी, जीवन संपवणं हा एकच मार्ग त्या व्यक्तीला दिसतो.
आत्महत्येच्या विचारांबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजूती आहेत. सामान्यांचा गैरसमज आहे की विचार किंवा परिस्थिती गंभीर होईपर्यंत लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार आत्महत्येबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज आत्महत्येचा विचार फक्त लक्ष वेधण्यासाठी असतो. जिल्हा पोलीस प्रशासन आणि श्री संतुलन कौन्सिलिंग सेंटरतर्फे लवकरच एक हेल्पलाईन सुरू करण्यात येईल. तसेच भरोसा सेंटरमध्ये देखील समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.