जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । यावल-फैजपूर रस्त्यावरील चितोडा गावानजीक दुचाकी व अॅपेरिक्षेच्या धडकेत तीन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. दरम्यान, जखमींमध्ये सहाय्यक तलाठी सुधाकर शांताराम झांबरे (वय ५०) गंभीर जखमी झाले असून त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले.
याबाबत असे की, यावल येथील सहाय्यक तलाठी राजेंद्र झांबरे हे गुरुवारी आपले कामकाज आटोपून सायंकाळी ६ वाजता दुचाकीने (क्रमांक एमएच.१९- एयू ६२१७) फैजपूरकडे जात होते. तर एमएच.१९-एस.२५७७ क्रमांकाची अॅपेरिक्षा घेऊन चालक शेख सलीम शेख गफ्फार (वय ३५) व सय्यद अबू बकर सय्यद इब्राहिम (वय ३२, दोघे रा.डांगपुरा यावल) हे फैजपूरकडून यावलला येत होते.
या दोन्ही वाहनांची चितोडा गावाजवळ धडक झाली. या अपघातात तिघे जण जखमी झाले. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. जखमींपैकी सहाय्यक तलाठी सुधाकर झांबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना १०८ वाहनाद्वारे डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.