जळगाव लाईव्ह न्युज । ३ सप्टेंबर २०२२ । गणेशोत्सवानिमित्त राज्यात उत्साहाचे वातावरण असताना, एसटी महामंडळातील ८०० चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. आज, शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी महामंडळाकडून चालकांचा वापर कमी होत असल्याचे कारण देण्यात आले आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यानी २७ ऑक्टोबर २०२१पासून संपाची हाक दिली होती. संप काळात राज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत राहणे आणि कर्मचाऱ्यांचा संप चिरडून टाकण्यासाठी महामंडळाने टप्याटप्याने एकूण ८०० चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली. एप्रिलमध्ये संप मिटल्यावर कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. यावेळी कंत्राटी चालकांना मुदतवाढ देण्यात आलेली होती.
उच्च न्यायालयाने २२ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर रुजू झाले. संप काळात वाहतूक सुरू ठेवण्यासाठी बाह्य संस्थेतर्फे चालक कम वाहक यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या नियुक्तीला सातत्याने मुदतवाढ देण्यात आलेली होती. सध्या महामंडळात कंत्राटी चालकांचा नगण्य वापर होत असल्याने ३ सप्टेंबरपासून कंत्राटी चालकांचा वापर बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, असे आदेश शुक्रवारी महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून काढण्यात आले आहेत.
संपातील सर्व कर्मचारी पुन्हा रुजू झाल्यावर आणि राज्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर कंत्राटी चालकांचे काम थांबवण्यात येणार होते, याची पूर्वकल्पना संबंधित कंत्राटी चालकांना देण्यात आलेली होती. आता कंत्राटी चालकांची सेवा थांबवण्यात आलेली आहे, असे एसटीतील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.