⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

या जगप्रसिध्द कलाकाराने चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर ४८ वर्ष पाहिली प्रेयसीची वाट!

जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ डिसेंबर २०२२ | आपण जेंव्हा फेमस लव्हस्टोरीज बद्दल बोलतो तेंव्हा आपसूकपणे रोमिओ-ज्युलिएट, हिर-रांझा, बाजीराव-मस्तानी, सलीम-अनारकली, सम्राट पृथ्वीराज चौहान-संयोगिता यांची नावे तोंडावर येतात व जेंव्हा जागतिक पातळीवरील आर्स्टिस्टबद्दल बोलतो तेंव्हा पिकासो, लिओनार्डो द विंची, क्‍लाऊड मोनेट, एम.एफ.हुसेन या नावांशिवाय ती चर्चा पूर्ण होत नाही. मात्र तुम्हाला जर कुणी सांगितले. या सर्वांपेक्षा एक मोठा आर्स्टिस्ट होता व त्याची प्रचंड हटके अशी लव्ह स्टोरी होती आणि हा व्यक्ती कुणी विदेशी नव्हे तर भारतीय होता व तो आपल्या जळगाव जिल्ह्यात राहत होता, तर तुमचा विश्‍वास बसेल का? होय, तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे. चाळीसगाव येथे राहून देश-परदेशांतल्या जवळजवळ ३०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या केकी मूस यांच्या बद्दल आपण बोलतोयं. याचं निमित्त म्हणजे आज ३१ डिसेंबरला केकी मूस यांची पुण्यतिथी आहे.

या कलाकाराचं पूर्ण नाव कैकुश्रु माणिकजी मूस. त्यांची आई मात्र त्यांना लाडाने ‘केकी’ म्हणायची. नंतर हाच अवलिया कलाकार केकी जगासाठी कलामहर्षी केकी मूस झाला. चाळीसगाव स्टेशनच्या धुळे प्लॅटफॉर्मच्या बाजूलाच एक दगडी बंगला दिसतो. त्याचं नाव ‘रेब्रा स्ट्रीट’. ते केकींचं कलादालन. केकी यांचा मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत १९१२ मध्ये एका पारशी कुटूंबात जन्म झाला. त्यांचे मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. त्यांचे नाव आर.सी.नरिमन. तत्कालिन व्ही.टी स्टेशन अर्थात आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे. आपणा सर्वांना मुंबईचे नरिमन पॉईंट माहित आहेच. हे नाव त्यांचेच आहे. मुबंईच्या विल्सन महाविद्यालयात पदवीपर्यंत केकी यांचे शिक्षण झाले पुढील उच्च शिक्षण ते इंग्लंडला रवाना झाले. केकींनी १९३५ मध्ये लंडनमधील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला. ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ने फोटोग्राफीच्या जागतिक दर्जाच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षांत घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला, अन् ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले. केकींनी १९३८-१९३९ या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, ब्रिटन, इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला. त्यानंतर केकी १९३९ च्या डिसेंबर महिन्यात भारतात परत आले. दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्षें, त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला आत्मकैद करुन घेत अखंड कलासाधना केली.

४८ वर्ष पाहिली प्रेयसीची वाट
सलग ४८ वर्ष या घरात राहून केकी त्यांच्या प्रेयसीची वाट पाहत होते असंही म्हटलं जातं. रोज रात्री एक वाजता मुंबईहून पंजाब मेल चाळीसगाव स्टेशनला पोहोचतो. त्या मेलच्या वेळी ते बंगल्याच्या गेटवर येऊन थांबायचे. ती त्या मेलने येणार होती म्हणे. त्यांना ती खरोखरच येईल अशी आशा होती. ती कोण होती? ती खरंच येणार होती का? या आणि अशा कितीतरी गोष्टी अनुत्तरित राहतात. मात्र केकी यांची ही लव्हस्टोरी आता जगप्रसिध्द झाली आहे. ते ज्या घरात राहिले तिथेच त्यांनी ३१ डिसेंबर १९८९ ला अखेरचा श्वास घेतला. याच घरात राहून त्यांनी देश-परदेशांतल्या पुरस्कारांवर आपलं नावही कोरलं. ते जवळजवळ ३०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी होते.

चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’
या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’! त्यांच्या स्टुडिओला भेट देणार्‍या जवळपास प्रत्येक मान्यवराचे त्यांनी एक आगळे वेगळे छायाचित्र काढलेले आहे. पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडित महादेवशास्त्री जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, ना. ह. आपटे, ना. सी. फडके, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, बाबा आमटे अशी कितीतरी नावे घेता येतील. या सगळ्या छायाचित्रांमध्ये लक्ष वेधून घेणारे एक छायाचित्र एका वृध्द फासेपारधी महिलेचे आहे. या वृद्ध महिलेच्या चेहर्‍यात त्यांना सार्‍या जगाचे दु:ख जसे दिसले. या वृद्धेच्या काढलेल्या छायाचित्रांना पुढे जगभर प्रसिद्धी मिळाली.

टेबलटॉप फोटोग्राफीचे जनक
चित्रकाराचा पिंड असणारे केकी मूस नंतर जगप्रसिध्द छायाचित्रकार झाले. चित्रकाराचा छायाचित्रकार होण्यासाठी कारण ठरलं दुसरं महायुध्द! कारण केकी ज्या कागदारवर ऑइल पेेंटिंग करायचे तो कागद दुसर्‍या महायुद्धादरम्यान भारतात येणं बंद झालं. त्यानंतर केकी यांनी अनेक प्रयोग केले. मात्र ते त्यांच्या मनासारखं होत नसल्याने ते फोटोग्राफीकडे वळाले. त्यांच्या फोटोग्राफीचे वैशिष्ठ म्हणजे, टेबलटॉप फोटोग्राफी…जे स्पेशल इफेक्ट्स आताचे फोटोग्राफर नवतंत्रज्ञानाचा वापर करुन जगासमोर सादर करतात. त्यापेक्षा कितीतरी सरस फोटोग्राफी केकी यांनी टेबलटॉप फोटोग्राफीच्या माध्यमातून समोर आणली. टेबलटॉप फोटोग्राफी म्हणजे, वस्तूंची कल्पक मांडणी करुन त्यांचा योग्य उंचीवरून काढलेला, सावल्यांवर विशेष भर असणार्‍या छायाचित्राला टेबलटॉप फोटो म्हणतात. टेबलटॉप फोटोग्राफीच्या माध्यमातून काढलेले छायाचित्र जिवंत असल्याचा भास होतो. या टेबलटॉप फोटोग्राफीसाठी लागणार्‍या चीजवस्तू त्यांनी घरातच जमवल्या होत्या. त्यांनी टेबलटॉपसाठी वापरलेल्या सगळ्या चीजवस्तू अजूनही चाळीसगावच्या केकी मूस कलादालनात आहेत. जवळजवळ त्यांच्या १५०० कलाकृतींची कल्पक मांडणी या कलादालनात केलेली आहे.