जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे २८ आमदार जात आहेत, शिवसेनेचे नुकसान होईल. त्या आमदारांना थांबवा, मुख्यमंत्री पद धोक्यात आले आहे, अशी विनंती शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली हाेती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. शेवटी सेनेचे एकनिष्ठ एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाचवायचा निर्णय घेतल्याने आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी घेतलेला हा निर्णय आहे, असे परखड मत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केले.
भडगाव येथे आमदारांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ही बैठक शिवसेना कार्यालयात ८ रोजी दुपारी ४.३० वाजता घेण्यात आली. यावेळी विकास पाटील, राजेंद्र पाटील, डाॅ. विशाल पाटील, प्रशांत पवार, संजय पाटील, इम्रान अली सय्यद, अनिल पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. या सर्वांनी आमदार किशोर पाटील यांनी घेतलेला निर्णय विकासासाठी आहे. त्यांना आम्हा सर्वांचे समर्थन असून आजही त्यांच्या सोबत आहोत. तर पुढच्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही त्यांना खंबीर साथ देवू, अशी जाहीर ग्वाही सर्वांनी दिली.