जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । बंद घराचा कडीकोयंडा तोडून, चोरट्यांनी ५८ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना चोपडा येथील आदर्शनगर भागात प्लॉट नंबर ( ६४- ब ) मघ्ये घडली. विलास पारधी असे घर मालकाचे नाव असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध त्यांनी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाटील यांच्या फिर्यादीवरून घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.
सविस्तर असे कि, घाडवेल ( ता.चोपडा ) येथील माध्यमिक शिक्षक विलास अशोक पारधी हे कुटुंबीयांसह शनिवारपासून सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर व शिर्डी या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. दरम्यात, १८ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंदा घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातील साहित्याची चोरांनी फेकाफेक केली. त्याचप्रमाणे किचनमधील लाकडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त केले. या घटनेत चोरट्यांनी ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. त्यात तीन हजार रुपये रोख, पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल, ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, सहा हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, १४ हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे डूल असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात विलास पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३८०, ४५४, ४५७ नुसार गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत.