जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । शहरातील फळ गल्ली परिसरात लॉकडाऊनचे चित्रीकरण करणाऱ्या न्यूज पोर्टलच्या पत्रकाराचा मोबाईल आणि कॅमेरा घेऊन दुचाकीस्वार तिघांनी पळ काढल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. एलसीबीच्या पथकाने एकाला मध्यरात्री अटक केली असून त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
शेरा चौकातील रहिवासी पत्रकार अल्ताफ इस्माईल शेख वय-३० वर्षे हे दि.२९ रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास ते पत्रकार तन्वीर पिंजारी यांच्यासह साने गुरुजी चौकातील फळ गल्लीत लॉकडाऊनबाबत आढाव्याचे मोबाईलने चित्रीकरण करीत होते. काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तिघांनी अल्ताफच्या हातातील मोबाईल आणि कॅमेरा हिसकावून टॉवर चौकाकडे पळ काढला. होता. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली.
एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांनी गुप्त माहिती काढली असता आकाश उर्फ नाकतोडा संजय मराठे वय-२१ रा.चौघुले प्लॉट याचे नाव समोर आले. पथकाने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल मिळून आला.
कल्पेश उर्फ बाळू देविदास शिंपी आणि एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने ओळखीचा मित्र विक्रम भाटी याच्याकडून खाजगी कारण सांगत मागून आणलेल्या दुचाकीवर चोरली असल्याची त्याने कबुली दिली आहे. एलसीबीच्या पथकाने आकाशला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.