⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्म पाळेल यात शंका नाही मात्र… : संजय सावंत

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ ।  राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्म पाळेल यात शंका नाही मात्र जर पाळाला नाही तर राज्यभर त्याचा चुकीचा संदेश जाईल अशी प्रतिक्रिया ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना जळगाव जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली.

तर झालं असं की, नुकतेच राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी अजित पवार यांनी चोपडा येथे होणाऱ्या निवडणुकीसाठी तयार व्हा असे आदेश आपल्या पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिले. यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी वरचढ होऊ पाहते आहे. असे चित्र निर्माण झाले होते. याबाबत शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हे उत्तर दिले.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटाला जितका आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. तितका पाठिंबा ठाणे जिल्हा वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यात मिळाला नाहीये. यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेत खऱ्या अर्थाने फूट पडलेली बघायला मिळत आहे. नेते शिंदे गटात तर कार्यकर्ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात असे चित्र जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे येत्या काळात या गोष्टीचा फायदा किंबहुना या फुटीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस उचलणार असे चित्र रंगताना पाहिला मिळत आहे. यामुळे शिवसेनेतही अंतर्गत खदखद काही प्रमाणात वाढली आहे.

तर दुसरीकडे, याबाबत शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्हा हा पारंपारिक शिवसेनेचा जिल्हा आहे. शिवसेनेचे आमदार वगळता इतर कोणीही शिवसेना सोडून इतर ठिकाणी गेलं नाहीये. वरिष्ठ पातळीवर शरद पवार साहेब हे जिल्ह्यातील शिवसेनेच्या जागा स्वतःच्या पक्षाकडे घेतील असं वाटत नाही. यामुळे आघाडी धर्म जळगाव जिल्ह्यात पाळला जाईल असे वाटत आहे. मात्र जर हा धर्म पाळला गेला नाही तर याचे दुष्परिणाम किंबहुना त्याचे चुकीचे अर्थ राज्यस्तरावर लावले जाऊ शकतात.