⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Theft : पोलीस निरीक्षकाच्या मुलाचे घर दोन महिन्यात दुसऱ्यांदा फोडले, ३ चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । जळगाव शहरातील दादावाडी परिसरापुढे तालुका पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी येथील दीपक मगन मेहते यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून रोकड व  दागिने असा एकूण २२ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दीपक मेहते यांचे वडील अमरावती येथे पोलीस निरीक्षक असून दोन महिन्यात दुसऱ्यांदा त्यांचे घर फोडण्यात आले आहे.

दादावादी परिसरातील विठ्ठलवाडी भागात दीपक मेहेते हे राहतात. गोवा येथील कंपनीत ते व्यवस्थापक असून ते तिकडेच राहतात. दि.५ मे पासून घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार समोर आला. मेहेते यांचे शालक देविदास जाधव यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी घरातील रोख रक्कम आणि दागिने असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दीपक यांचे वडील मगन मेहेते हे अमरावती येथील चांदुरनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक आहेत. 

दरम्यान, मार्च महिन्यात दीपक मेहते यांच्या लहान मुलाचे लग्न असल्याने ते बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी हीच संधी साधत त्यांच्या घरात डल्ला मारून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर देखील काहीही शोध लागला नाही. दरम्यान, झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन चोरटे परिसरात फिरताना दिसून आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी परिसरातच आणखी एका सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडल्याची माहिती समोर येत असून तपास सुरु आहे.