जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । यावल (Yawal) तालुक्यात शेत-शिवारातून साहित्य चोरी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच तालुक्यातील चितोडा (Chitoda) शिवारातील प्रभाकर लालजी महाजन यांच्या शिवारातून अज्ञात चोरट्यांनी तीन खांबावरील विद्युत तार लांबवले. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला. सुमारे 40 हजार रूपये किंमतीचे हे विद्युत तार असुन या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात गुन्हा
सांगवीचे सहाय्यक अभियंता मिलिंद गंगाराम इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सांगवी कक्ष अंतर्गत चितोडा शिवारात येते. या चितोडा शिवारात प्रभाकर लालजी महाजन यांचे शेत गट क्रमांक 512 मध्ये चार विद्युत खांब आहे. बुधवारी या चार खांबावरील तीन गाळ्यातील लघू दाबाचे विज तार जागेवर नव्हते. उभ्या खांबावरील लघुदाबाचे व सुमारे 40 हजार रुपये किंमतीचे वीज तार चोरट्यांनी लांबवले.
याबाबतची माहिती तंत्रज्ञ महेद्र महाजन यांनी दिल्यानंतर पाहणी करण्यात आली व नंतर यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.