⁠ 
रविवार, मे 5, 2024

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात चोरी; सव्वा लाखाचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । कापूस वेचणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कमेसह दागिने लंपास केल्याची घटना पारोळा तालुक्यातील करंजी येथे घडली. भर दिवसा सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करंजी (ता.पारोळा) येथील शेतकरी शांताराम लक्ष्‍मण पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याच्या शेतातील कापूस वेचणीसाठी गेले होते तर मुलगा शाळेत गेला होता. मुलगा सकाळी १० वाजता शाळेतून घरी परतल्यानंतर तो देखील घराला कुलूप लावून व चावी खिडकीत ठेवून शेतात कापूस वेचण्यासाठी आला. त्यानंतर तो पुन्हा १०.३० वाजेच्या सुमारास घरी परत आला असता त्याला घरचा दरवाजा उघडा दिसला व घरातील सामान कपडे साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्याने तातडीने ही माहिती वडिलांना दिली. त्यांनी घरी पोहोचल्यानंतर गोदरेज कपाटकडे धाव घेतली. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून एक लाख २२ हजार ६९७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व दोन हजार रुपये रोख असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे लक्षात आले. शांताराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय रवींद्र बागुल करीत आहे.