जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील एका २७ वर्षीय तरुणीची तीन महिन्यापूर्वीच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका Dr.Mark नामक व्यक्तीशी मैत्री झाली होती. मैत्रीत विश्वास संपादन करीत संबंधीत व्यक्तीने महागडे गिफ्ट पाठवीत असल्याचे तरुणीला सांगितले. गिफ्ट स्वीकारण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात तरुणीला पैसे टाकण्यास सांगितले. काही दिवसात तरुणीने तब्बल ६ लाख ४९ हजार रुपये खात्यात टाकले. आपली मैत्रीतून फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने तिने सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची ऑगस्ट महिन्यात इन्स्टाग्रामवर DR.mark नामक व्यक्तीशी मैत्री झाली होती. समोरील व्यक्तीने तरुणीसोबत अगोदर मैत्री केली. त्यानंतर तिच्या व्हॉट्सअपवर संपर्क केला. तरुणीशी बोलताना त्या व्यक्तीने बोलत विश्वास संपादन केला. यानंतर तरुणीला महागडे गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगितले. गिफ्ट स्वीकारण्यासाठी पैसे भरावे लागणार असल्याचे सांगून वेळोवेळी तिच्याकडून तब्बल ६ लाख ४९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर मागवले.
पैसे ऑनलाईन स्विकारून कोणतेही गिफ्ट न पाठवता आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. इंस्टाग्रामवर मैत्री करून तब्बल ६ लाख ४९ हजारांचा चुना लावल्याप्रकरणी DR.mark नामक व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.