जळगाव लाईव्ह न्यूज । अनियमित पाऊस, उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या विहिरी आणि सातत्याने खालावत जाणारी भूजल पातळी या दुष्टचक्रात अडकलेल्या धरणगाव (Dharangaon) तालुक्यात ‘जलसंकल्प’ मोहिम राबविण्यात येत आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या संकल्पनेतून धरणगाव तालुक्यात जवळपास ३१० किलोमीटर लांबीच्या नाले आणि नदीपात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे. ‘जलसंकल्प धरणगावचा’ या उपक्रमांतर्गत अवघ्या दीड महिन्यात ३५ किलोमीटरपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.

सुपीक गाळ ठरणार ‘काळ्या आईचे सोने’
या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नदी आणि नाल्यांमधून काढला जाणारा गाळ शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत दिला जात आहे. हा सुपीक गाळ जेव्हा शेतात टाकला जाईल, तेव्हा जमिनीची सुपीकता आणि पोत कमालीचा सुधारेल. यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच नदीपात्र आणि नाल्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे पाणी साठवण क्षमता घटली होती, ज्यामुळे पावसाळ्यात पाणी पात्राबाहेर पडून पिकांचे नुकसान व्हायचे आणि उन्हाळ्यात तीव्र टंचाई जाणवायची. आता खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे नदीपात्रातील साचलेला गाळ काढून काठांचे बळकटीकरण केले जात आहे.

विहिरी-बोअरवेल्स जिवंत होणार
चालू वर्षी धरणगाव परिसरातील भूजल पातळी तब्बल साडेतीन मीटरने खाली गेल्यामुळे संपूर्ण जिल्हा ‘डार्क झोन’मध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला होता. पाऊस पडतो पण पाणी वाहून जाते, या समस्येवर हा प्रकल्प रामबाण उपाय ठरणार आहे. ३१० किमीच्या नाले आणि नदीपात्रांच्या खोलीकरणामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरेल. परिणामी, परिसरातील विहिरी आणि बोअरवेल्सची पाणीपातळी वाढून उन्हाळ्यातही शेतकऱ्यांना विहिरींचा मोठा आधार मिळणार आहे.
तांत्रिक नियोजन आणि लोकसहभाग
या प्रकल्पासाठी देशातील मोठ्या नदीजोड प्रकल्पांवर काम केलेल्या ‘यश इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी’ मार्फत अत्याधुनिक तांत्रिक सर्व्हे करून राबवला जात आहे. प्रत्येक नाल्याचा नैसर्गिक उतार, जलप्रवाह आणि साठवण क्षमता लक्षात घेऊन नियोजनबद्ध काम सुरू आहे.
प्रशासन, सीएसआर संस्था आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहभागातून धरणगाव तालुक्यात सुरू झालेली ही मोहीम केवळ नाला खोलीकरणापुरती मर्यादित नसून, भविष्यातील जलसुरक्षेचा एक व्यापक आराखडा आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेले हे कार्य येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रासाठी जलसंधारणाचे एक ‘आदर्श मॉडेल’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







