जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्हाणपुर-मलकापुर महामार्गावरील पुरनाड फाटा ते शुगर फॅक्टरी दरम्यान तसेच डोलारखेडा फाटा ते कुऱ्हा काकोडा रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांच्या फांद्या तसेच काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजुने वाहन चालविणे धोकेदायक ठरत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्हाणपुर-मलकापुर महामार्गावरील पुरनाड फाटा ते शुगर फॅक्टरी तसेच डोलारखेडा फाटा ते कुऱ्हा काकोडा या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांच्या फांद्या व काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजुने वाहन चालविणे धोकेदायक ठरत आहे. या रस्त्याने अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते. रात्रीच्या वेळेस दुचाकीवरून प्रवास करतांना अनेक दुचाकीस्वारांच्या चेहऱ्यांना या काटेरी फांद्यांचे फटके बसत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे या प्रकाराकडे सर्रासपणे दुर्लक्ष करीत आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी साईडपट्ट्या मोकळ्या करण्यात येतात. मात्र, यावर्षी अद्यापपर्यंत काटेरी झुडपे काढण्यात आली नसल्याने वाहनचालक त्रस्त असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत लक्ष द्यावे, मागणी होत आहे.
ठिकठिकाणी पडले खड्डे
दरम्यान, या रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविले गेले नसल्याने वाहनधारकांकडून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महालखेडा व सुकळी लगत मागील वर्षी नविन पुल बांधण्यात आला. मात्र वर्ष उलटूनही या पुलावर व रस्ता बनविलाच नसल्याने हा रस्ता खड्डेमय झाला असून धोकेदायक ठरत आहे.