जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । मागील काही दिवसापासून राज्यातील विविध भागासह उत्तर महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे. हे सावट आज शनिवारपर्यंत कायम राहणार असून उद्या रविवारपासून राज्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ४०.२ अंश सेल्सिअस तापमान नाेंदवले गेले. त्यात आठवड्यात तीन अंशांनी वाढ हाेण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रावातामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले हाेते. त्याचा प्रभाव म्हणून पाच दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि काेकण, गाेव्यावर अवकाळी पावसाचे ढग जमले हाेते. कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने रविवारनंतर अवकाळी पावसाचे सावट दूर हाेणार आहे. शनिवारपर्यंत राज्यात ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज शनिवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात वातावरण ५१ टक्के ढगाच्छादित हाेते. कमाल तापमान ४०.२ अंशांवर तर वाऱ्याचा वेग ताशी ११ किमीपर्यंत हाेता. वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळांची तीव्रता वाढली हाेती.