जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । सावखेडा येथे हॉटेल देव जवळ एका पिशवीत जवळपास १ लाख ४३ हजाराचा गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या चोपडा तालुक्यातील निमगव्हाणच्या एका व्यक्तीस अमळनेर पोलिसांनी ३० रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छापा टाकून रंगेहाथ पकडले.
अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे हॉटेल देव जवळ एक व्यक्ती पिशवीत गांजा घेवून विक्रीसाठी उभा असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली हाेती. त्यावरुन पाेलिस निरीक्षक हिरे यांनी डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, सिद्धांत शिसोदे, राहुल चव्हाण, नीलेश मोरे यांना सावखेडा येथे पाठवले. तेथे पाेहाेचताच पोलिसांनी संशयित व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न करताच तो पिशवीसह पळू लागला. परंतु, पाेलिसांनी त्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या पिशवीत पाच पाकिटात १ लाख ४३ हजारांचा ९ किलो ६४७ ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी राजपत्रित अधिकाऱ्यांसमोर पंचनामा केला. गांजा बाळगणारा व्यक्ती हा निमगव्हाणच्या गुजरवाडा येथील जगदीश काशीनाथ पाटील असल्याचे समजते.