---Advertisement---
जळगाव जिल्हा एरंडोल विशेष

उत्राणच्या तरुणाची कहाणी.. सुरक्षारक्षक, रिक्षाचालक ते गीतकार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । विष्णू मोरे ।  कलाकारच्या कलेला कुठेही मरण नसते. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील मच्छिन्द्र पवार हा तरुण नोकरीसाठी मुंबईला गेला. सुरक्षारक्षक, रिक्षाचालक म्हणून त्याने काम केले. शालेय जीवनापासून जोपासलेले वक्तृत्व आणि व्यासपीठाच्या आवडीने त्याच्यातील कलाकार जागृत ठेवला. मुंबईत जम बसत असताना आई-वडिलांच्या सेवेसाठी तो गावी परतला. शासकीय योजनेचा लाभ घेत व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले, कर्ज काढून गावात खाद्यपदार्थ विक्रीची गाडी सुरु केली आणि सोबतच आपला गाणे लिहिण्याचा छंद देखील जोपासला. मच्छिन्द्र पवार यांनी लिहिलेल्या ३-४ अहिराणी गाण्यांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळत आहे.

WhatsApp Image 2021 10 17 at 4.20.27 PM

जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात अहिराणी गाण्यांना मोठी पसंती मिळत आहे. अहिराणी भाषेला राज्यभरात पोहोचविण्याचे काम या गाण्यांच्या माध्यमातून स्थानिक कलाकार करीत आहेत. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रहिवाशी व सध्या युट्यूबवर गाजत असलेले ‘गाडी पोम, पोम’चे या गाण्याचे गीतकार मच्छिन्द्र पवार यांच्या जीवनकहाणीत प्रचंड संघर्ष आणि जिद्द आहे.

---Advertisement---

मच्छिन्द्र पवार यांनी गाडी पोम पोम, खान्देश येडा व्हयना, अरे आयेकना, तू मनी जिंदगानी आदी गाणे लिहिली आहेत. एका गाण्याचे लिखाण पूर्ण झाले आहे, मात्र त्याचे चित्रीकरण अद्याप बाकी आहे. काही गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्वतःच्या मातृभाषेत गाणे लिहिणे व त्या गाण्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम, प्रतिसाद मिळणे या गोष्टी ‘आणखी नवीन काही करण्याची’ प्रेरणा देतात, असे त्यांनी सांगितले.

वर्गमित्रांचा हेवा झाला आवडमध्ये परावर्तित

घरची परिस्थिती जेमतेम होती. कमवू तर खाऊ अशी परिस्थिती असल्याने गाणे लिहिणे, म्हणणे या गोष्टींची घरातील कोणत्याच सदस्याला आवड नव्हती. शालेय शिक्षण घेत असतांना वर्गातील विद्यार्थी स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे म्हणून मी देखील वर्क्तृत्व व नाट्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. त्यातून नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड निर्माण होत गेली ‘स्टेज डेरिंग’ वाढत गेली. वर्ग मित्रांचा हा हेवा कधी आवडमध्ये परिवर्तित झाला हे समजलेच नाही. असे मच्छिन्द्र पवार म्हणाले.

आई-वडिलांसाठी मुंबईहुन आले गावी

घरची परिस्थिती जेमतेम असल्याने भाऊ मुंबई येथे खाजगी नोकरीला होते.भावाच्या सोबतीने मच्छिन्द्र पवार यांनी देखील २००७ साली कामाच्या शोधार्थ मुंबई गाठली. तेथे सुरुवातीला सिक्युरिटी गार्ड, कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर स्वतःची ऑटो रिक्षा घेतली व उदरर्निवाह केला. आई-वडील गावाकडेच असल्याने मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात मन रमेना, मग २०१८ साली पुन्हा उत्राण या गावी ते परतले आणि तेथून पुन्हा आपल्या अभिनय आणि गाण्यांकडचा प्रवास सुरु झाला.

छंद पूर्ण करताना रोजगार गरजेचा
आपला छंद पूर्ण करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची देखील काळजी ते घेतात. रोजगार सांभाळून मिळालेल्या वेळेत गाण्यांचे लिखाण देखील करतात. मच्छिन्द्र पवार यांनी मुंबई येथून गावी परतल्यानंतर नाशिक येथे मिटकॉनतर्फे आयोजित ‘निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण’ घेतले. तेथून परतल्यानंतर पुणे येथून महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन, फास्ट फूडसह इन्स्टंट फूडचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गावातच ‘एम चटपटा’ या नावाने चायनीज फूड व्हॅन सुरु केली. यातून रोजगार निर्माण झाला. ‘खाना आणि गाना’ या क्षेत्रात आणखी पुढे जाण्याचा त्यांचा मानस आहे.

शब्द सुचतात तेव्हा ते लिहून ठेवतात
दुकान बंद करून घरी गेल्यानंतर जेव्हा सर्व झोपी जातात तेव्हा रात्रीच्या शांततेत त्यांचा गाणे लिहिण्याचा प्रवास सुरु होतो. एकास वेळी पूर्ण गाणे लिहिले जात नाही. कधी कधी दुकानावर खाद्यपदार्थ बनवितांनाही गाण्याची ओळ अचानक जुळून येते, आपण ती ओळ विसरून जाऊ नये म्हणून हातातील काम सोडून एखाद्या कागदावर ती ओळ उतरवून घ्यावी लागते. अशा तुकड्यांमधून ते गाणं पूर्ण होतं. दुकान आणि छंद सांभाळतांना कुटुंबाचा आधारही तितकाच महत्वाचा असतो. ‘एम चटपटा’ सेंटर सांभाळण्यात त्यांना पत्नी दीपाली आणि मुलगा संकेत यांचे मोठे सहकार्य लाभते.

कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या – मच्छिन्द्र पवार 
कोणतेही काम सोपे नाही, रिस्क आणि मेहनत यात आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नये. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वयं रोजगार, उद्योग सुरु करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. हे करीत असतानाही रिस्क आणि मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे. जीवनात रिस्क घेतली पाहिजे, परंतु ती कॅल्क्युलेटेड असयला हवी, नाही तर लाईफ रिस्की होते, अशी बोलकी प्रतिक्रिया मच्छिन्द्र पवार यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---