⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | महामार्गाच्या बायपास उड्डाणपुलावरील कामाला आला वेग

महामार्गाच्या बायपास उड्डाणपुलावरील कामाला आला वेग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासच्या कामाला वेग आला आहे. पाळधी ते तरसोद दरम्यान २३ किमीचे हे काम होत आहे. बायपासअंतर्गत येणाऱ्या पाच उड्डाणपुलांपैकी दोन उड्डाणपुलांच्या कामाला वेग आला आहे. मंगळवारपासून कानळदा रस्त्यालगतच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. कामाचा वेग पाहता येत्या सहा महिन्यांतच या पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर गिरणा नदीच्या पुरामुळे थांबलेल्या पुलाचे कामदेखील आता वेगात सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस खांब तयार करण्याचे काम सुरू आहे.

ममुराबाद शिवारात अद्याप कामांना सुरुवात झालेली नाही. बायपासवर पाळधी, गिरणा नदी, कानळदा रस्ता, लेंडी नाला, ममुराबाद रस्ता व भुसावळ व रेल्वेलाइन या सहा ठिकाणी पूल व उड्डाण पूल तयार करावे लागणार आहेत. त्यापैकी पाळधीजवळील उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षीच सुरु झाले आहे. दरम्यान, पाळधी ते तरसोदपर्यंत होत असलेल्या या बायपासचे काम मार्च २०२३ पर्यंत करण्यासाठी मुदत आहे. कानळदा रस्त्यावर होत असलेल्या उड्डाणपुलाची दिशा मुख्य रस्त्यापेक्षा चुकीची असल्याने या पुलाची दिशा बदलण्यात यावी अशी मागणी भाजपचे तालुकाप्रमुख गोपाल भंगाळे यांनी केली आहे. याबाबत नहीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती भंगाळे यांनी दिली आहे.

गेल्या पाच वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, निविदाप्रक्रियेत झालेल्या घोळामुळे बायपासच्या कामाला २०१९ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत पाळधी, भोकणी, आव्हाणे व ममुराबाद शिवारातील बायपासच्या कामाला बऱ्यापैकी वेग आला असून, पाळधीकडील बाजूला असलेल्या रस्त्यालगत आता पूर्ण भराव टाकण्यात आला आहे. हीच परिस्थिती आव्हाणे शिवारातदेखील दिसून येत आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह