‘रंगमंच’ पुस्तकाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उत्साहात प्रकाशन

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ मार्च २०२३ | नाटकांच्या वाचनीय कलाकृती आणि संहितांचा ठेवा असलेल्या ॲड. सुशील अत्रे लिखित कृपा प्रकाशन प्रकाशित ‘रंगमंच’ या पुस्तकाचे मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशन जळगाव शहरातील व.वा.वाचनालय सभागृहात पार पडले.


यावेळी अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन तर प्रमुख पाहुणे जेष्ठ नाट्यकलावंत डॉ. हेमंत कुलकर्णी, जेष्ठ नाट्यकर्मी शरद मुजुमदार, कृपा प्रकाशन च्या रेवती कुरंभट्टी यांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचा परिचय ॲड. पंकज अत्रे यांनी दिला. प्रास्ताविक ॲड. सुशील अत्रे यांनी केले. तर प्रकाशनाची पार्श्वभूमी रेवती कुरंभट्टी यांनी सांगितली.

यावेळी अशोक जैन म्हणाले की, मी कायम नाटक, कलावंत यांच्याशी जुळलेलो आहे. अनेक कलाकृती या शहरात घडल्या आहेत. हा नाटकांचा ठेवा आपण जतन करायला हवा यासाठी पुरुषोत्तम करंडक च्या धर्तीवर जैन करंडक लवकरच सुरू करणार असल्याचे सांगतले.


या पुस्तकात एकूण ८ संहिता असून २ अंकामध्ये हे पुस्तक आहे. ‘नाट्यसंहितांना अनुरूप म्हणून ‘खंड’ न म्हणता त्यांना ‘अंक-१’ व ‘अंक-२’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये विनोदी, गंभीर, भावनिक, उपहासात्मक, वैज्ञानिक, मानसशास्त्रीय, तात्त्विक अशा वेगवेगळ्या साच्यातली नाटके आहेत. ‘एकपात्री दीर्घांक’ यासारखा वेगळा प्रयोगही त्यात आहे.