जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२२ । जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी दुधाचा पुरवठा करणाऱ्या जळगाव दूध संघाच्या संकलनात दिवसाला ३५ ते ४० हजार लिटर दुधाचा तुटवडा भासत असून तूट भरून काढण्यासाठी गाय व म्हशीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय संघाच्या शनिवारी झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत झाला. त्यामुळे गायीच्या दुधासाठी तीन तर म्हशीच्या दुधाला साडेतीन रुपये उत्पादकाला अधिक मिळतील.दरम्यान, दाेन दिवसांत म्हशीच्या दुधाच्या विक्री दरातही प्रतिलिटर दाेन रुपयांची वाढ हाेऊ शकते. तर अाठवडाभरात तुपाच्या दरातही ३० ते ५० रुपयांची प्रतिलिटर वाढ हाेण्याची चिन्हे आहेत.
सहा महिन्यांपासून खरेदी दरात तीनवेळा वाढ करूनही संघाने एकदाच गायीच्या दूध विक्री दरात एक मार्चला लिटरला दोन रुपये वाढ केली होती. मात्र, उन्हाची तीव्रता वाढत असताना दूध संकलनात माेठी घट येत आहे. त्याचा परिणाम पुरवठ्यावर हाेताे आहे. अगाेदरच जिल्ह्यात इतर खासगी डेअरींचा शेअर वाढत असल्याने मार्केटमध्ये टिकून राहण्यासाेबत संघाच्या अर्थकारणासाठी दरवाढ करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी मंदाकिनी खडसेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय झाले. या वेळी सदस्य संजीव पाटील, प्रमाेद पाटील,एमडी मनाेज लिमये आदींची उपस्थिती हाेती.
शनिवारच्या बैठकीत दूध विक्री दरात वाढ करण्याबाबत निर्णय झाला नाही; परंतु ताे दाेन दिवसांत मार्केटमधील इतर स्पर्धक डेअरीच्या भाववाढीचा अंदाज घेऊन घेण्यात येणार आहे. गायीच्या दुधाचे दर एक मार्च राेजी दोन रुपयांनी वाढवले असल्याने त्यात सध्या वाढ हाेण्याची शक्यता नाही; परंतु म्हशीच्या दूध दरात दोन रुपये प्रतिलिटर वाढ होण्याची शक्यता आहे.
तूपही महागणार
गेल्या आठवड्यात शहरातील खासगी दूध डेअरींनी तुपाच्या विक्री दरात ६० रुपयांची वाढ केली आहे. त्याचप्रमाणे दूध संघाकडूनही येत्या अाठवडाभरात तुपाचे दरदेखील ३० ते ५० रुपये वाढू शकतील.