जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस जळगाव दौर्यावर होते. काल जळगाव येथे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील यांच्या निवासस्थानी खासदार शरद पवार यांची काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व पदाधिकार्यांनी भेट घेतली. यावेळी खासदार शरद पवार आणि डॉ.उल्हास पाटील यांनी हस्तांदोलन करत काही वेळ चर्चाही केली. आगामी लोकसभा निवडणूकांच्या दृष्टीने हे राजकीय हस्तांदोलन चर्चेचा विषय ठरले.
खासदार शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांची तब्बल चार वर्षानंतर एकत्रित भेट झाली. या भेटीत खा.शरद पवार यांनी ‘डॉक्टर काय सुरु आहे’ अशी विचारपूस केली. तसेच त्यांनी तयारी सुरु ठेवा असा सूचक सल्ला देखील डॉ.उल्हास पाटील यांना दिला. याप्रसंगी खा.शरद पवार यांचा हात डॉ.उल्हास पाटील यांच्या हातात हात होता. तसेच खासदार शरद पवार आणि डॉ.उल्हास पाटील या दोघांच्या चेहर्यावर स्मितहास्य होते. खा.पवारांनी दिलेला सूचक सल्ला आणि राजकीय हस्तांदोलनाने उपस्थीतांच्या भुवया उंचावल्या.
यावेळी उपस्थीत नेत्यांमध्ये हास्याचे फवारे देखील उडाले. सन २०१९ मध्ये डॉ.उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी ऑफर देण्यात आली होती मात्र डॉ.उल्हास पाटील यांनी नम्रपणे त्यास नकार दिला होता. हे सारे असले तरी आगामी काळात होणार्या लोकसभा निवडणूकांच्या दृष्टीने खा.शरद पवार आणि डॉ.उल्हास पाटील यांच्या राजकीय हस्तांदोलनाची जिल्हाभरात चर्चा रंगली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार हे उपस्थीत होते.
पुन्हा खासदार होण्याची राजकीय महत्वकांक्षा
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची पुन्हा खासदार होण्याची राजकीय महत्वकांक्षा संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. सन १९९८ मध्ये काँग्रेसपक्षाने त्यांना लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी विक्रमी मतांना ते विजयी देखील झाले. मात्र त्यांना खासदारकीचा पाच वर्षांचा पूर्ण कालावधी मिळाला नाही. अवघे १३ महिन्यात सरकार कोसळल्याने लोकसभा बरखास्त झाली. सन १९९९ मध्ये पराभूत झाल्यानंतर २००४ मध्येही त्यांना काँग्रेसतर्फे पुन्हा उमेदवारी मिळाली. मात्र ते पराभूत झाले. सन २००७ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. सन २००९ मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. तर २०१४ मध्येही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिली. यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. मात्र त्यांचा पराभव झाला.
२०१९ मध्ये काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवून डॉ.उल्हास पाटील पुन्हा अधिकृतपणे रिंगणात उतरले. मात्र त्यांचा पराभव झाला. यामुळे आता २०२४ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. आमदार एकनाथ खडसे यांच्यामुळे या भागात राष्ट्रवादीला फायदा होईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादीला असल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी या मतदारसंघावर दावा करु शकतो. दरम्यान, डॉ.उल्हास पाटील यांनीही स्वत: निवडणूक लढण्याऐवजी त्यांनी कन्या डॉ.केतकी पाटील यांना पुढे केल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार व डॉ.पाटील यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
लेवा समाजाचाच खासदार!
या मतदारसंघात मराठा समाजाचे मताधिक्य साडेतीन लाखांच्या वर आहे. मात्र, या ठिकाणी दोन लाखात मताधिक्य असलेल्या लेवा समाजाचाच खासदार निवडून येत असतो. रावेर मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचे सुमारे २ लाख ५ हजार मतदार आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाला संधी मिळाली आहे.
एका सर्व्हेनुसार, रावेर मतदारसंघात मराठा समाज ३ लाख ७० हजार तर दोन लाख ५ हजारांवर लेवा समाजाचे मतदार आहेत. मुस्लिम २ लाख, बौद्ध २ लाख १० हजार, गुर्जर ७८ हजार, माळी ८५ हजार, कोळी १ लाख १२ हजार, पावरा आणि पारधी २१ हजार, धनगर ४३ हजार, बंजारा ७० हजार, तडवी ४४ हजार, राजपूत ४२ हजार, तेली ३८ हजार, राजस्थानी ८० हजार अशी समाजनिहाय मते आहेत.