जळगाव लाईव्ह न्यूज | ४ जानेवारी २०२३ | जळगाव व धुळे जिल्ह्यास वरदान ठरणारा निम्न तापी पाडळसे प्रकल्प खान्देशातील मोठा सिंचन प्रकल्प आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळला आहे. १९९७ ला १४२. ६४ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. आता या प्रकल्पाचे बजेट तब्बल २ हजार ७५१ कोटींवर जावून पोहचले आहे. मात्र अजूनही या प्रकल्पाचे काम वेग घेण्यास तयार नाही. सद्यस्थितीत प्रकल्पाच्या कामासाठी सिमेंट, लोखंड, स्टील, सेंट्रिंग आदी सर्व साहित्य व यंत्रणा आपल्याकडे आहे. मात्र, वाळूची उपलब्धता नसल्याने काम थांबले असल्याचे निम्न तापी प्रकल्प विभागाचे म्हणणे आहे.
पाडळसे प्रकल्प पूर्ण झाला असता तर जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली असती. हा प्रकल्प अपूर्ण असल्याने दरवर्षी लाखों लिटर पावसाचे पाणी वाहून जाते. राजकीय व प्रशासकीय पातळीवरील उदासिनतेमुळे हा प्रकल्प गेल्या २५-२६ वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे. अमळनेर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत पाडळसे प्रकल्पाचा मुद्दा राजकीय अजेंड्यावर असतो. धरणासाठी केंद्राकडून भरघोस निधी आणण्याचे आश्वासन भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र, त्यातही बळीराजा सिंचन योजना व पंतप्रधान सिंचन योजनेतही धरणाचा समावेश होत नसल्याने हे धरण पूर्ण होण्याची आशा फोल ठरली. आताही दररोज नवनवी आश्वासने दिली जात असली तरी प्रकल्पाचे काम रखडलेलेच आहे!
राजकीय व प्रशासकीय पातळीवरील उदासिनता
पाडळसे प्रकल्प १९९५- ९६ पासून मंजूर आहे. १९९७ ला १४२. ६४ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. १९९९ ला २७३.०८ कोटींची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता, २००३ ला ३९९.४६ कोटी रुपयांची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता, २००९ ला ११२७. ७४ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर आहे. त्यानंतर टप्प्या- टप्प्याने सुमारे ४३५ कोटींचा निधी धरणावर खर्च झाला असून, यात स्तंभ क्रमांक एक ते २३ (१२ व १८) वगळून १४० मी. तलांकापर्यंत काम झाले आहे. त्यानंतर सुमारे २७-२८ वर्षांनंतरही या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. या प्रकल्पाचे बजेट तब्बल २ हजार ७५१ कोटींवर जावून पोहचले आहे. यास राजकीय व प्रशासकीय पातळीवरील उदासिनता कारणीभूत आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी पाडळसे धरण संपर्ष समितीसह अनेक सामाजिक संस्था/संघटनांतर्फे प्रयत्न करण्यात आले. मात्र हा प्रकल्प अद्यापही अपूर्ण स्थितीतच आहे, हेच कटू सत्य आहे.
पाडळसे प्रकल्पाची तांत्रिक माहिती
अमळनेर तालुक्यात मौजे पाडळसे गावाजवळ तापी नदीवर हा प्रकल्प होत आहे. एप्रिल १९९९ पासून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून प्रकल्पाचे ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे. ११२७.७४ कोटींची सुप्रमा प्राप्त असून २७५१ कोटीची चतुर्थ सुप्रमा मान्यतेची कार्यवाही सुरू आहे. प्रकल्पावर आतापर्यंत ५४१.७३ कोटी रुपये खर्च झाला असून अजून २२०९.३२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. निम्न तापी प्रकल्पाची टप्पा १ ची प्रकल्पीय सिंचन क्षमता २३३२८ हे. असून प्रकल्पीय पाणीसाठा २६२.५८ दलघमी आहे. प्रकल्पाचे उजव्या तीरावरील माती धरणाचे काम पूर्ण झाले असून डाव्या तीरावरील माती धरणाचे काम ७० टक्के झाले आहे. तर धरणाचे बांधकाम सांडवा मुर्धा पातळी १३९.२४ मी.पर्यंत झाले आहे. प्रकल्पाचे स्थापत्य कामे, वक्राकार दरवाजे, उर्वरित भूसंपादन व पुनर्वसन कामे वेळेत (जून २०२६) पूर्ण होण्यासाठी दरवर्षी ३५० ते ४०० कोटींची गरज आहे.