जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । खान्देश मिलची जागा राजमुद्रा रियल इस्टेटच्याच मालकीची असल्याच्या वस्तुस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून, त्यासंदर्भात यापुढे कुणालाही आव्हान देता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचे प्रतिपादन, राजमुद्राचे वकील ऍड. नितीन जोशी यांनी रविवारी केले.
आमदार शिरीष चौधरी आणि कामगार नेते एस.आर. पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन खान्देश मिलची जागा सरकारजमा करण्याची मागणी केली. त्यासंदर्भात राजमुद्रा रियल इस्टेटची बाजू जाणून घेण्यासाठी ऍड. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही माहिती दिली. एकदा सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम निर्णय देऊन नव्याने आव्हान देण्यास मज्जाव केला आहे. असे असतानाही काही लोक जाणूनबुजून प्रकरण उपस्थित करीत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे असून, राजमुद्रा रियल इस्टेट त्यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे मार्ग खुले ठेवत आहे, असेही ऍड. नितीन जोशी म्हणाले.