⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची कामे करावीत – जिल्हाधिकारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२३ ।  बांधकाम विभाग आणि मनपामध्ये शहरातील रस्त्यांच्या कामांबाबत वाद होत आहेत. पर्यायी आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम असले तरी महापालिकेच्या अभियंत्यांनीही त्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहेत.

जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातून शहरातील ४९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. महापालिकेअंतर्गत रस्ते असले तरी रस्त्यांची कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहेत. रस्त्याची कामे हि संथगतीने होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ही कामे गतीने व्हावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.


रस्त्याच्या कामांत महापालिकेतर्फे व्यत्यय आणला जात असल्याची तक्रार मक्तेदारांची आहे. रस्ते तयार न केल्यानंतर महापालिका त्या ठिकाणी जलवाहिनीसाठी खोदकाम करीत असते. त्यामुळे या रस्त्याचे काम पुन्हा करावे लागते. परिणामी, रस्त्याच्या कामात विलंब होत असल्याचा आरोप मक्तेदारांचा आहे. रस्त्याचे काम होण्यापूर्वीच महापालिकेने जलवाहिनी टाकून घ्यावी, अशी मागणीही मक्तेदाराने केली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पत्र दिले असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांचा वाद जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्याचे सांगण्यात आले. आमदार सुरेश भोळे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आयोजित केली होती. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शहरातील कामांची माहिती घेतली.


रस्त्यांची कामे होत असताना सावजनिक बांधकाम विभाग व महापालिका अभियंत्यांनी उपस्थित राहावे, असे आदेश दिले. शहरातील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असली, तरी त्याची जबाबदारी महापालिकेच्या अभियंत्यांचीही आहे. त्यामुळे कामांबाबत त्यांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याचे काम करताना जलवाहिनी जोडण्याचा निर्णय अगोदर घ्यावा. त्यामुळे तयार झालेले रस्ते खोदण्याची आवश्यकता पडणार नाही. दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने हे काम करावे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे करावीत, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले