जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । शहरातील श्रीकृष्ण लॉनमध्ये एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्नासाठी आलेल्या वधू मातेच्या पाठीला अचानक खाज सुटली असता त्या अंघोळीसाठी गेल्या असता त्यांच्या मागे असलेल्या एका लहान मुलीने पर्स आणि मोबाईल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणाऱ्या मंगला मुरलीधर सपकाळे वय-५६ यांच्या मुलीचा विवाह असल्याने त्या परिवारासह दि.९ रोजी श्रीकृष्ण लॉन्स शिरसोली रोड येथे आल्या होत्या. दि.९ रोजी साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम आटोपून त्या रात्री ११ वाजेच्या सुमारास लॉन्समधील खोलीकडे जात होत्या. रूमकडे जात असताना त्यांच्या मागे एक ११-१२ वर्षीय मुलगी येत होती. अचानक पाठ खाजवायला लागल्याने त्यांनी स्वतःचा मोबाईल पर्समध्ये ठेवला. तेव्हा ‘आंटी आप नहा लो’ असे ती मुलगी म्हणाली. मंगला सपकाळे यांनी मोबाईल, पर्स पलंगावर ठेवली आणि दागिने देरानीकडे दिले व त्या फ्रेश होण्यासाठी गेल्या. काही वेळाने देरानी देखील त्यांच्यासोबत गेल्या.
थोड्यावेळाने मंगला सपकाळे या परत आल्या असता त्यांना मोबाईल आणि पर्स दिसून आली नाही. खोलीत आणि बाहेर त्यांनी त्या मुलीचा शोध घेतला असता ती मुलगी देखील दिसून आली नाही. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. ५ हजारांचा मोबाईल आणि ८ हजार रुपये रोख असा १३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी त्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.