कर्जबाजारी कापूस उत्पादक शेतकरी बोलतोय..! माणुसकीच्या नात्याने माझं म्हणणं नक्की वाचा

जळगाव लाईव्ह न्यूज | चिन्मय जगताप | तर जसं मी सांगितलं मी कर्जबाजारी आणि कापसाला भाव मिळेल अशी आस लावून बसलेला कापूस उत्पादक शेतकरी बोलतोय. असं म्हणतात की एक काळ होता जेव्हा सोन्याला आणि कापसाला एकच भाव असायचा. म्हणून कापसाला पांढर सोन म्हटलं गेलं. इंग्लिश मध्ये सुद्धा कापसाला ‘कॅश क्रॉप’ म्हणतात. म्हणजे ज्याची शेती केली की शेतकऱ्याला ‘कॅश’ मिळते. आणि आता कॅश मिळणं ही दंतकथा होऊन गेली आहे. आम्हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी.

आम्हाला अजूनही आठवतंय गेल्यावर्षीचा तो प्रसंग. जेव्हा आमच्या कापसाला तब्बल 12 हजार रुपयांचा भाव मिळाला होता. १२ हजार भाव मिळाल्याने शेतकरी खूप खुश झाला होता आणि यंदा अजून दुपटीने कापूस वाढवू कापूस जगवू जेणेकरून शेतकऱ्याला पैसे मिळतील अशी आस लावून शेतकरी बसला होता. मात्र १२ हजार सोडा १० हजार ही भाव मिळत नाही आम्हाला सध्या.

आमच्या शेतीला भाव मिळेल या आशेमुळे आम्ही भरमसाठ कर्ज घेतलं. कापूस लागला की लगेच सावकाराला किंवा बँकेला पैसे परत देऊ असा आत्मविश्वास आमच्यात होता. मात्र आमच्या आत्मविश्वासाची ऐशी तैशी केली आहे आजच्या या मिळणाऱ्या भावाने.

काही वर्षांपूर्वी एक नेते होते जे विरोधी पक्षामध्ये होते. ज्यांनी कापसाला भाव मिळत नाही म्हणून अभूतपूर्व अस मोठ आंदोलन केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती झाली होती. सध्या ते उपमुख्यमंत्र्यांचे संकट मोचक आहेत. मात्र आमच्या कापसाला भाव मिळावा यासाठी ते काहीही करत नाहीत. संकटात जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री किंवा त्यांचा पक्ष सापडतो तेव्हा तेव्हा ते संकट मोचक म्हणून आपली भूमिका फार चांगली पार पाडतात. मात्र शेतकरी जो आज संकटात सापडलाय त्याच संकट मोचक व्हायला ते तयार नाहीयेत.

अजून एक नेते आहेत. ज्यांच आत्ताच मुख्यमंत्री पद गेल आहे. आम्हाला एकदा निवडून आणा शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करतो असं म्हणणारे ते मोठे नेते. आता फक्त गद्दार गद्दार गद्दार इतकच म्हणताना दिसत आहेत. शेतकऱ्यांकडे त्यांचा लक्षच नाही.

विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकांवर टीका करण्यात धुंद आहेत. मात्र आमच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाहीये. खरच सांगतो आमचा 80 टक्के कापूस घरात पडू आहे. वजनात घट होते आहे. कापसाची वाट लागते आहे. आज ना उद्या कापसाला भाव मिळेल अशी आस आम्हाला आहे. म्हणून आम्ही कापूस घरात ठेवलाय. मात्र आमच्या कापसाला भाव देण्याची हिंमत कोणी करत नाहीये.

हे सरकार ‘कॉमन मॅन’ सरकार आहे. सर्वसामान्य नागरिकांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे असं मुख्यमंत्री ओरडून ओरडून सांगत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांकडे कापसाला भाव कसा द्यावा? याचं उत्तर नाही.

अशावेळी शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? याचे उत्तर जर तुम्हाला म्हणजे वाचणाऱ्या ताई तुला किंवा दादा तुला माहिती असेल ना तर जरा सांग. खरच सांगतोय आम्हाला भाव मिळत नाहीये. आम्ही पुन्हा शेती करण्यासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून? आमचं वाढणार व्याज फेडणार कोण? अश्या असंख्य विवंचनेमध्ये आम्ही घरात फक्त बसून आहोत. आस लावून बसलोय कापसाला भाव मिळेल याची.

आपला,
कर्जबाजारी कापूस उत्पादक शेतकरी