रब्बी हंगामासाठी हतनूरमधून पहिले आवर्तन सोडले; ‘या’ तालुक्यातील शेतकर्यांना होणार फायदा
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२३ । हतनूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. धरणातून 450 क्युसेस वेगाने हे आवर्तन आले असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक महिन्याला दुसर्या पंधरवड्यात आवर्तन दिले जाणार आहे. यामुळे रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील पाणलोटक्षेत्रातील शेतकर्यांना रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.
हतनूर धरणातून रब्बी हंगामासाठी चार आवर्तन सोडावे, अशी मागणी पाणी वापर संस्था व सल्लागार समितीने केली होती मात्र प्रशासनाकडून तीन आवर्तन दिले जाणार आहेत. यातील पहिले आवर्तन शुक्रवारी (दि.24) देण्यात आले. तर नंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकर्यांच्या मागणीनुसार पूढील दोन आवर्तन दिले जाणार आहेत. दरवर्षी हतनूर धरणातून चार आवर्तन दिले जातात, मात्र यंदा परतीचा पाऊस नसल्याने धरणात आवक कमी झाली. यामुळे यंदा तीन आवर्तन देण्यासाठीही प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.
हतनूर धरणातून रब्बी हंगामासाठी उजव्या तट कालव्यातून आवर्तन दिले जाते. यामुळे लाभक्षेत्रात येणार्या रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील तब्बल 37 हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. पाऊस कमी झाल्याने भुजलपातळी खालावली आहे. उजव्या तट कालव्यातून पाणी आवर्तन दिल्याने शेतकर्यांना या पाण्यावर रब्बीचा हंगामाला मोठी मदत होईल.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणार्या पाणी वापर संस्थांनी केलेल्या मागणीनुसार पहिले आवर्तन शुक्रवारी सोडण्यात आले. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. या पुढील काळातही शेतकर्यांच्या मागणीनुसार दोन आवर्तन दिले जाणार आहेत. यंदा उशिरापर्यंत आवक नसल्याने रब्बीसाठी दिलेल्या आवर्तनाचे पाणी धरणाच्या साठवणीतून कमी झाल्याची माहिती हतनूरचे शाखा अभियंता एस.जी.चौधरी यांनी दिली.