जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२३ । यावल तालुक्यातील न्हावी येथे पाच वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेबाबत मोठी माहिती समोर आलीय. मुलीच्या दुर्धर आजाराला कंटाळून बापाने तिला विहिरीत ढकलून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी मारेकरी पित्याला मध्य प्रदेशातून अटक केली असून ठुशा भावलाल बारेला ३२ असे आरोपी पित्याचे नाव आहे.
काय आहे नेमकी घटना?
न्हावी (ता. यावल) गावात मारूळ रस्त्यावर ठुशा भावलाल बारेला हा कुटुंबासह राहतो. गुरुवारी तो आपल्या ५ वर्षीय मुलीस घेवून घरातून निघाला होता. तेंव्हापासून त्याच्यासह मुलगी अनिता बारेला हे बेपत्ता होते. शनिवारी सायंकाळी मुलीचा मृतदेह गावालगत असलेल्या सुनील फिरके यांच्या शेत विहिरीत आढळला. मुलगी वडिलांसोबतच गेली होती. त्यामुळे पोलिसांचा वडिलांवर संशय होता.पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता मुलीला दुर्धर आजार असल्याने आपणच तिचा खून केल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून लवकरच कोर्टात उभे करण्यात येईल.
पुण्यात गुंड अभी तांबेसह दोघांवर मोक्का कारवाई: शहरातील धानोरी परिसरातील गुंड अभिषेक ऊर्फ अभी रमेश तांबे याच्यासह दोन साथीदारांविरुद्ध पोलिस आयुक्तांनी मोक्का कारवाईचे रविवारी आदेश दिले आहेत. अभिषेक तांबे (२१, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे), सुमीत नागेश लंगडे (२५, रा. बर्माशेल, इंदिरानगर, लोहगाव रस्ता, पुणे), प्रज्वल प्रशांत शिंदे (१८, रा. तिरुपती एन्क्लेव्ह, धानोरी रस्ता, पुणे) अशी मोक्का कारवाई केलेल्या आरोपीची नावे आहेत. तांबे आणि साथीदारांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. तांबे आणि साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तांबे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलिसांनी दिला आहे.