अति दुर्दैवी! ७ वर्षांच्या मुलासमोरच शेतकरी पित्याने घेतलं विषारी औषध
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२३ । कर्जबाजारीला कंटाळून ३५ वर्षीय शेतकऱ्याने ७ वर्षांच्या मुलासमोरच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आलीय. बाळू भंगू पवार (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे कि, बाळू पवार हे शेती करत असून त्यांनी १६ ऑगस्ट रोजी दुपारी शेतात विषारी औषध प्राषण केलं. हा प्रकार बाळू पवार यांचा ७ वर्षांचा मुलगा रामेश्वर याच्यासमोरच घडला. मात्र, विषप्राषण केल्यानंतर बाळू पवार यांना त्रास होवू लागल्यानंतर मुलगा रामेश्वर बाजूच्या शेतात काम करत असलेल्या इतरांना बोलाविले. इतर शेतकऱ्यांना बाळू पवार यांनी विषप्राषण केल्याचे लक्षात आल्यानंतरच लागलीच जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरु असतानाच बाळू पवार यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, सततची नापीकी, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे पीकांचे नुकसान होत होते. तसेच त्यांनी कर्ज देखील घेतले होते. आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने पीकांचे नुकसान झाल्यास कर्ज वाढेल. या भितीने बाळू पवार यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.