⁠ 
रविवार, मे 19, 2024

पत्रकाराचा ७५ हजाराचा मोबाईल लांबवला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । भुसावळात रविवारी आठवडे बाजार असल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे तीन मोबाईल भामट्यांनी लांबवले आहे. यात एका पत्रकाराचा ७५ हजार रुपयांचा आयफोन मोबाइलचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी आठवडे बाजारात गस्त करून ऐन दिवाळीच्या काळात ग्राहकांवर येणारी संक्रांत दूर करावी अशी मागणी होत आहे.

येथील आठवडे बाजारात रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार मिलिंद टोके हे भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या खिशात असलेला सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा आयफोन चोरट्याने लांबवला. याच एक तासाच्या अंतरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या अन्य दोन ग्राहकांचे सुद्धा मोबाईल चोरट्यांनी लांबवल्याची बाजारात चर्चा होती. या प्रकरणी पत्रकार टोके यांनी येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना मोबाईल चोरीची माहिती दिली.

याप्रकरणी पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत होती. बाजारामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र पोलिसांकडून पाहिजे तशी कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.दर आठवडे बाजारात कोणाचा तरी मोबाईल चोरीला जात असतो, त्यामुळे रविवारी आठवडे बाजारात पोलिसांची गस्त सक्त करावी अशी मागणी होत आहे. गेल्या महिन्यात डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीपी प्लॅटूंची गस्त बाजारात ठेवली होती. त्यानंतर मात्र पुन्हा पोलिसांची गस्त नसल्याने चोरटे सक्रिय झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

दुपारी दीड वाजेच्या सुमारास टोके यांच्या चोरलेल्या मोबाईलचे लोकेशन जळगाव शहरातील प्रताप नगर येथे दाखवत असल्याचे त्यांच्या हातावर असलेल्या आधुनिक घड्याळ मध्ये दिसत होती. त्यांनी ही माहिती पोलिसांना सुद्धा दिली होती मात्र, मोबाईलचे बिल टोके देऊ न शकल्याने पोलिसांनी त्याची कच्ची नोंद घेतली होती.