जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ | ‘दिव्या खाली अंधार’ या म्हणीला शोभेल असा प्रकार जामनेर व चाळीसगाव या दोन्ही तालुक्यात सुरु आहे. ही दोन्ही तालुके राज्यात व केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाच्या मंत्री गिरिश महाजन व खासदार उन्मेष पाटील या दोन वजनदार नेत्यांची आहेत. मात्र जामनेर व चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात बुडाले आहे. याचं कारण म्हणजे, वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील ३४५ जिल्हा परिषद शाळांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केला आहे तर तब्बल २४९ शाळांचे मीटर देखील काढून नेण्यात आलं आहे. यात सर्वाधिक शाळा जामनेर व चाळीसगाव तालुक्यांमधील आहेत. चाळीसगाव तालुक्यातील ५७ शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून २३ शाळांचे मीटर काढून नेण्यात आले आहे. तर जामनेर तालुक्यातील ५५ शाळांचा वीजपुरवठा खंडीत असून ४७ शाळांचे मीटर काढून नेण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजीटल शाळांचा मोठा गाजावाजा करण्यात आला. जि.प. शाळांमधील मुलांना संगणकाचे शिक्षणासह अन्य तंत्रज्ञान देण्याच्या गप्पा मारत असतांना अनेक शाळांमध्ये वीजपुरवठाच नसल्याचे भान शिक्षण विभागाला राहिलेले नाही. जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा खंडीत होण्यामागे राज्य सरकारचे धोरणच कारणीभुत आहे. कारण, जि.प. शाळांना शैक्षणिक खर्च व इतर खर्चासाठी सादिल अनुदान दिले जात असे. मात्र आता ते बंद करुन समग्र शिक्षा अभियानांतर्गंत ठराविक निधी शाळांना दिला जातो. यातून शाळेची स्टेशनरी, खडू, कागद, झाडूसह स्वच्छतागृहांची स्वच्छता, देखभाल व दुरुस्ती करावी लागते. याच निधीतून वीजबिल देखील भरावे लागते. मात्र वीजेचे दर मोठ्याप्रमाणात वाढले असल्याने ते भरणे शाळांना शक्य होत नाही. ही आर्थिक जुळवाजुळव करतांना मुख्यध्यापक व शिक्षकांनाच परदमोड करण्याची वेळ येते. या आर्थिक ताणामुळे जि.प. शाळांचे वीजबिल थकले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जि.प. शाळांकडे तब्बल ३७ लाख ८८ हजार ७९२ रुपयांची थकबाकी आहे. थकित वीजबिल भरण्यासाठी महावितरणने संबंधित शाळांना वारंवार सुचना देवूनही त्यांना वीजबिल थकबाकी भरणे शक्य झाले नाही. परिणामी महावितरणने शाळांचा वीजपुरवठा खंडीत केला. (कंसात मीटर काढून नेलेल्या शाळांची संख्या) यात चाळीसगाव तालुक्यातील ५७ शाळांचा वीजपुरवठा खडीत करण्यात आला असून २३ शाळांचे मीटर काढून नेण्यात आले आहे. त्यापाठोपाठ, जामनेर तालुक्यातील ५५ (४७), पाचोरा ३३ (१९), धरणगाव २३ (२०), भुसावळ १२ (४), अमळनेर २९ (६), रावेर २३ (३९), यावल २० (१२), जळगाव १७ (१४), मुक्ताईनगर १७ (१५), भडगाव १५ (१७), चोपडा १४ (८), पारोळा १३ (१४), बोदवड १० (४) तर एरंडोल तालुक्यातील ७ शाळांचा वीजपुरवठा खंडीत केला असून ७ शाळांचे मीटर काढून नेण्यात आले आहे.