शिक्षकांच्या मागण्या अजित पवारांपर्यंत पोहोचवणार..
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या रास्त असून, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यातर्फे राज्य शासनाकडे विधिमंडळात शिक्षकांची कैफियत मांडली जाईल, असे आश्वासन जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी शिक्षकांना दिले.
आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. देवकर, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी भेट देऊन शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन श्री. देवकर यांच्याकडे सोपविले.
निवेदनात शिक्षकांनी म्हटले आहे, की आम्हाला शैक्षणिक कामकाज करू द्या, शालेय उपक्रमांचा शिक्षकांवर होत असलेला भडीमार कमी करुन आम्हाला शिकवू द्या, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगाचा खंड दोन लागू करून सर्व तरतुदी लागू कराव्यात, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी, शिक्षकांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे, एम एस सी आय टी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात यावी यासह विविध मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत. या सर्व मागण्यांचा अजित पवार यांच्यामार्फत विधिमंडळात पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री. देवकर यांनी शिक्षकांना यावेळी दिले.