⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

सहा वर्षाच्या बालिकेला न्याय देण्यासाठी न्यायालय पोहचले लकवाग्रस्त साक्षीदाराच्या घरी; आरोपीला सात वर्षांची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ डिसेंबर २०२२ | न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र सहा वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला अवघ्या दहा महिन्यात शिक्षा सुनावण्यासाठी अमळेनर न्यायालयाने जलद गतीने काम केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एका प्रत्यक्ष साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यासाठी न्यायालयाने त्याच्या घरी जावून कायेदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. प्रत्यक्ष साक्षीदाराला लकवा झाला असल्याने त्याला न्यायालयात आणणे कठीण होते. मात्र बालिकेला न्याय देण्यासाठी व आरोपीला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी न्यायालयाने उचललेल्या या पाऊलाचे जिल्हाभरात कौतूक होत आहे.

१० जानेवारी २०२२ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका सहा वर्षाची बालिकेला तिचे आई वडील तिला आजीजवळ सोडून शेतात मजुरीसाठी गेले असताना चोपडा तालुक्यातील बाबूलाल बारकू भिल वय २८ याने पीडित सहा वर्षाच्या बालिकेला बोरे खाण्याचे आमिष दाखवून नाल्यात घेऊन गेला. तिचे हात बांधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथून जाणार्‍या भावलाल कोळी यांनी ही घटना पाहिल्यानंतर बाबूलाल तेथून पळून गेला. भाऊलाल याने मुलीच्या आई वडिलांना झाला प्रकार सांगितल्याने आरोपी बाबूलाल विरुद्ध विनयभंग व पोकसो कायद्यांतर्गत ११ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १९ रोजी बाबूलाल यास अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. या खटल्याचे कामकाज अमळनेर येथील अतिरिक्त न्यायालयात सुरू होता.

या प्रकरणात बालिकेला आरोपी दिसणार नाही, याची काळजी घेत न्यायाधीशांच्या कक्षामध्ये संबंधित बालिकेचा जबाब घेण्यात आला. मात्र या घटनेचे प्रत्यक्ष साक्षदार भाउलाल यांना लकवा झाला होता. यामुळे त्यांची साक्ष नोंदविण्यास अडचणी येत होत्या. यामुळे न्या. पी.आर.चौधरी यांनी कोर्ट कमिशनर अ‍ॅड.आर.व्ही.निकम व नोन्ही पक्षाच्या वकिलांना साक्षीदाराच्या घरी जावून साक्ष नोंदविण्याचे आदेश दिले. या खटल्यात सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी सात साक्षीदार तपासले. त्यात तपासी अधिकारी जी सी तांबे, पीडित बालिका, तिची आई, भावलाल कोळी यांची साक्ष ग्राह्य धरून न्या पी आर चौधरी यांनी आरोपीला कलम ३५४ प्रमाणे सात वर्षांची शिक्षा व पोकसो कायदा कलम ८ प्रमाणे पाच वर्षांची शिक्षा सुनावली.