डोलारखेड्याच्या सोनार परिवाराचा तहसीलसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न!
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२३ । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी ग्रामपंचायततर्गत असणाऱ्या मौजे डोलारखेडा येथील जागेवरील अतिक्रमण काढण्यात येऊ नये यासाठी सोनार परिवाराने तहसील कार्यालयाच्या समोर आत्मदहन आंदोलनादरम्यान अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.मात्र वेळेवर पोलीस व होमगार्ड च्या जवानांनी प्रसंगावधान राखत संबंधितांना अडविल्यामुळे अनुसित प्रकार घडला नाही.
याबाब सविस्तर वृत्त असे की, डोलारखेडा येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण बाबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे.येथील बौद्ध पंच मंडळाने हि जागा बुद्ध उद्यानाकरीता मागणी केलेली आहे.मात्र याजागेवर सोनार कुटुंबियांचे अतिक्रमण आहे.यासाठी बौद्ध समाजबांधवांकडुन १६ ऑक्टोबर रोजी डोलारखेडा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.दरम्यान आ.चंद्रकांत पाटील यांनी बौद्ध समाज बांधवांना जागा मिळवुन देणे बाबत आश्वासनही दिले होते.याजागेबाबत न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे.
मात्र ग्रामपंचायत तर्फे अतिक्रमण काढले जात असल्याची चाहुल लागताच अतिक्रमण धारक सोनार परिवाराने तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलनादरम्यान अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.रविंद्र कडु सोनार,प्रमिला कडु सोनार,पल्लवी रविंद्र सोनार,प्रकाश रामचंद्र सोनार व ताईबाई प्रकाश सोनार या पाचही जणांनी अंगावर पेट्रोल ओतले मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला.