रुग्णवाहिकेनेच घेतला बालकाचा बळी, चालकाने काढला पळ
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । मेंढ्या चारून कुटुंबियांसह शेत शिवाराकडे परतत असलेल्या १० वर्षीय बालकास भरधाव रुग्णवाहिकेने धडक दिल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी कन्नड रस्त्यावरील पहिलवान ढाब्याजवळ घडली होती. दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश भाऊराव खरात (वय-२२, रा. खिरडी पाताेंडे, ता. नांदगाव, जिल्हा नाशिक) हे दि.२ नोव्हेंबर रोजी बोढरे शिवारात कुटुंबासह मेंढ्या चारण्यासाठी आले होते. कन्नड घाट परिसरात मेंढ्या चारून दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुख्य मार्गाने बोढरे शिवाराकडे परतत असतांना कन्नड रस्त्यावरील पहिलवान ढाब्याजवळ पांढऱ्या, निळ्या रंगाच्या भरधाव क्रुझर रुग्णवाहिकेने मेंढ्यांच्या कळपामागे चालणाऱ्या दीपराज मोतीराम उर्फ नवनाथ चव्हाण (वय-१०) यास धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर रुग्णवाहिका चालकाने अपघाताची माहिती न देता कन्नडकडे पळ काढला होता.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या दीपराज यास चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले हाेते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर दीपराज याचा मृतदेह त्याच्या मूळगावी मिटमिटा (जिल्हा-औरंगाबाद) येथे नेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी गणेश भाऊराव खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात रुग्णवाहिका चालकाविरोधात मंगळवार दि.९ राेजी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.