जळगाव जिल्हा

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना बोंडअळी निर्मूलनाची माहिती द्यावी : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात कापूस हे महत्वाचे पीक आहे. या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने बांधावर जाऊन शेतकऱ्यांना बोंडअळी निर्मूलनाची माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.

गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, मोहीम अधिकारी पी.एस. महाजन, जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश काबरा, कापूस बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी सुशील सोनवणे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, जिल्ह्यात यंदा सर्वदूर झालेला व लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून कापूस पिकाचा हंगाम वाढविण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गुलाबी बोंडअळीसाठी अखंडित अन्नपुरवठा होत राहिल्याने या किडीचा प्रादुर्भाव वाढत जाईल. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. बंगळूर येथील क्रॉपी जीवन ॲग्रो रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटतर्फे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देवांग यांनी बोंड अळी नियंत्रणासाठी अद्ययावत नोंद घेण्यात आली आहे. याबाबत कृषी विभाग, कृषी विद्यापीठाने क्षेत्रीयस्तरावर प्रात्यक्षिके घ्यावीत, अशाही सूचना त्यांनी केल्या.

धान्य पेरणी करण्याचे आवाहन
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये कापूस पिकावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रचार व प्रसार करुन शेतकरी बांधवांमध्ये जनजागृतीसाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व कापूस बियाणे कंपन्यांतर्फे संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत खरीप हंगाम 2022 मध्ये बोंडअळीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापूस पिकाची फरदड घेण्यापासून शेतकरी बांधवांना परावृत्त करुन रब्बी हंगामात हरभरा, गहु, रब्बी ज्वारी व मका यांची पेरणी करण्याचे आवाहन करण्यात येत असुन यासाठी कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना हरभरा, गहु, रब्बी ज्वारी व मका बियाणे अनुदानावर उपब्ध करुन देण्यात आलेले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सद्य:स्थितीत शेतकरी बांधवांनी कापूस पिकावर अनावश्यक किटकनाशकांचा वापर न करणे व फरदड न घेता कपाशीच्या पऱ्ह्यांटपासून कंपोस्ट खत तयार करावे व हेच खत जमिनीत टाकल्यास जमिनीची सुपिकता वाढेल, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी ठाकूर यांनी सांगितले.

जनजागृती रथाला हिरवी झेंडी
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनाच्या जनजागृतीसाठी मे.राशी सीडस प्रा.लि., कावेरी सीडस कंपनी, मे. महिको लि. यांनी तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिरवा झेंडा दाखविला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button