⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

मणिपूरच्या हिंसाचारात अडकलेला जिल्ह्यातील ‘तो’ तरुण येणार परत !

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । आदिवासी-बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षात मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार पाहायला मिळाला होता. या हिंसाचारात तब्बल ५४ जण ठार झाले आहेत. मात्र यावेळी जळगाव जिल्ह्यातील एक तरुण याठिकाणी अडकला होता. त्या विद्यार्थ्याला पुन्हा जिल्ह्यात आणण्यात येणार आहे.

मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली होती. हा विद्यार्थी बोदवड तालुक्यातील आहे. मोहित खाडपे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याला मुंबई येथे आणले असून लवकरच तो जळगावात दाखल होणार आहे.

मोहित हा मणिपूर येथील नॅशनल इन्स्टिस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी बी-टेकचे शिक्षण घेत आहे. तो बी-टेकच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मणिपूरमध्ये ज्या ठिकाणी हिंसाचार सुरु आहे, तो त्या ठिकाणाहून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर राहतो.

मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर मोहितला महाराष्ट्रात परत आणावे या संदर्भात मोहित खाडपे याच्या नातेवाईकांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याजवळ मदत मागितली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यंत्रणा फिरवत त्यामुळे मणिपूरमध्ये देखील यंत्रणा कामाला लागली आणि विद्यार्थ्यांच्या परतीसाठी प्रयत्न सुरू झाले.