नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । कारागृहातील बंद्यांना कोरोना (कोव्हिड -19) विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच दररोज कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांना अलगीकरण व संस्थात्मक विलगीकरण सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, जळगाव परिसरातील प्रशिक्षाणार्थी वसतीगृहामधील एकूण 4 खोल्या (3 खोल्या पुरुष कैदी व 1 खोली महिला कैदी) हे ठिकाण पुढील आदेश होईपावेतो अधिग्रहीत करण्यात येत आहे. याठिकाणी तात्पुरते कारागृह हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करीत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
याठिकाणी पोलिस अधिक्षक, जळगाव शहर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम (विद्युत विभाग), जिल्हा शल्य चिकीत्सक आणि अधिक्षक, जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-2 यांनी आरोग्य सुविधा, आवश्यक त्या सोईसुविधांसह सुरक्षेच्या योजना करुन आवश्यक ती खबरदारी घ्यावयाची आहेत. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.