जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२५ । मार्च ते मे या तीन महिन्यांत सर्वाधिक चटके हे मे महिन्यातच बसतात; मात्र यंदाच्या मे महिन्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाळ्याऐवजी पावसाळ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात गेल्या २७ वर्षांमध्ये मे महिन्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद बुधवारी झाली.

ऐन उन्हाळ्यात बेमोसमी पाऊस कोसळत असून या जळगाव जिल्ह्यातील तापमानात मोठी घट होत आहे. बुधवारी (७ मे) जळगाव शहरातील कमाल तापमानाची ३३.४ अंश एवढी नोंद ममुराबाद वेधशाळेकडे करण्यात आली. मे महिन्यात याआधी वर्ष १९९८ च्या नंतर तापमान कधीही ३३.४ अंश इतके खाली गेले नव्हते. वर्ष १९९८ मध्ये ३३.९ अंशांची नोंद मे महिन्यात झाली होती. त्यानंतर २००९, २००७, २००२ या वर्षामध्ये दिवसाचे तापमान ३५ अंशांपर्यंत कमी झाले होते. यावर्षी निचांकी तापमानामुळे जळगावकरांना उष्ण झळांपासून दिलासा मिळाला आहे.
उन्हाळ्यातील उष्ण तीन महिन्यांमध्ये मे महिना सर्वाधिक तापमानाचा महिना मानला जातो. जळगाव जिल्ह्यात मे महिन्यातील दिवसाच्या तापमानाची सरासरी ४२ अंश एवढी आहे. ८ मेपर्यंत जळगाव शहरातील मे महिन्यातील तापमानाची सरासरी ही ३९ अंश एवढी राहिली आहे. मे महिन्यातील तापमानाच्या सरासरीचा विचार केला, तर यंदाच्या तापमानात ३ अंशांची घट होत आहे. गेल्या चार दिवसांत शहरातील दिवसाच्या तापमानात तब्बल १० अंशांची घट झाली आहे. रविवारी ४३ अंशांवर असलेले तापमान बुधवारी ३३ अंशांवर आले होते.
मे महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमानात घट होणे विशेष आहे. तरी अजून काही दिवस ढगाळ वातावरण व तापमानात घट राहणार आहे. पुढील दोन आठवड्यांत एक ते दोन उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. मात्र, त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही वादळी वारा व पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ यांनी दिली आहे.