जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२६ । यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हाडे गोठवणारी थंडी जळगावकरांना जाणवली. मात्र जानेवारीमध्ये सातत्यानं हवामानातील चढउतारामुळे जिल्ह्यात थंडीची तीव्रता जाणवलेली नाही. ढगाळ वातावरण आणि वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळे सध्या जळगावमधील थंडी गायब झाली असून, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जळगावकरांना उन्हाचे चटके बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात यंदा हिवाळ्याचा कडाका अपेक्षेपेक्षा लवकर ओसरत असून फेब्रुवारी महिन्यातच तापमानात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्यात किमान दोन थंडीच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत जिल्ह्यात थंडीची तीव्र लाट जाणवलेली नाही. त्यामुळे जळगावकरांना फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके सहन करावे लागणार असल्याचे चित्र आहे.

हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात सध्या ईशान्य दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे थंड हवामान टिकून राहण्यास आवश्यक असलेली स्थिती निर्माण होत नाही. तसेच उत्तर भारतातील मध्य प्रदेश व राजस्थानच्या पठारावर सध्या कोरडे वातावरण असल्याने तिथून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणामही कमी झाला आहे.

काल शुक्रवारी जळगावच्या तापमानात वाढ दिसून अली. किमान तापमान १२.६ अंशावर गेले. तर दिवसाचे कमाल तापमानही वाढून ३०.४ अंशावर गेले आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता कमी असून, किमान तापमान १२ ते १३ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. दिवसा तापमान ३० अंशांपर्यंत स्थिर राहू शकते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात हळूहळू वाढ होऊन दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे.
अवकाळी पावसाचा इशारा
तापमानातील या बदलांसोबतच जिल्ह्यात अवकाळी पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. तापमान वाढल्याने हवेत बाष्पाचे प्रमाण वाढेल आणि त्यातून ढगनिर्मिती होऊन काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यातही अवकाळी पावसाची स्थिती राहू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
एकूणच, यंदा जळगाव जिल्ह्यात हिवाळा अल्पकाळ टिकून फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागणार असून, तापमानवाढीसोबतच अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामानतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.






