जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२५ । मार्च निम्मा संपला. आतापासूनच राज्यात तापमान वाढीचा कहर दिसून येत असून काही शहरामधील तापमानाने ४० अंशापर्यंत मजल मारली आहे, यामुळे उष्णता आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. अशातच आता हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता आहे.रावती, यवतमानळ, वर्धा, अकोला आणि नागपूरमध्ये आज उष्णतेची लाट येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी दुपारच्यावेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाली आहे. चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहचला आहे. अकोला ४१ तर अमरावती ४० वर्धा ४१ आणि नागपूरमध्ये ४०.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात ३८ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात पुढील काही दिवस तापमान अशीच राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील वातावरण देखील स्थिर असणार आहे. कोकणातील काही भागात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जळगावात तापमानात घट होणार?
जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असून, धूलिवंदनाच्या दिवशी पारा ४०.५ अंशांवर पोहोचला होता. त्यानंतर शनिवारी तो ३९.७ अंशांवर आला. दरम्यान, २० मार्चपर्यंत तापमान ३७ ते ३९ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. या काळात किमान तापमान हे २० ते २२ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहणार आहे. कमकुवत झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे शीत हवेचा किंवा शीतलहरीचा प्रभाव जवळपास संपुष्टात आलेला आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली.