जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२५ । सध्या राज्यासह जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून एप्रिलमध्येच ‘मे हिट’चा तडाखा जाणवत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जळगावकर हैराण झाले असून त्यात अजून काही दिवस जळगावकरांचा हा त्रास कमी न होता अजून वाढणार आहे.

जळगाव जिल्ह्यात आगामी तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. जळगाव शहराचा पारा आगामी दोन ते तीन दिवसांत ४४ ते ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावकरांसाठी आगामी काही दिवस हे तीव्र उष्णतेचे राहणार आहेत.
सोमवारी जळगावमध्ये कमाल तापमान ४२ अंश तर किमान तापमान २४.६ अंश इतके होते. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसत आहे. दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे कठीण झाले असून, यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. तापत्या उन्हापासून जळगावकरांना अजूनही दिलासा मिळण्याची चिन्ह नाहीय. जिल्ह्यात आगामी दोन दिवस पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आगामी तीन ते चार दिवस वातावरण कोरडेच राहणार आहे. त्यात राजस्थान, मध्य प्रदेशमार्गे उष्ण वारे अजून तीव्र होणार आहेत. त्यामुळे तापमानात अजून वाढ होणार आहे. वाऱ्याचाही वेग जास्त राहणार असल्याने उष्ण झळा जास्त तीव्र होतील
एप्रिल अखेरपर्यंत दिलासा नाही…
अति तापमानाची नोंद जेव्हा होते, त्यानंतर काही दिवसांत पावसाची स्थिती निर्माण होत असते. मात्र, ३० एप्रिलपर्यंत तरी जिल्ह्यात पावसाची स्थिती दिसत नाही. त्यातच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उष्णतेची लाट कायम राहू शकते. मात्र, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळीची स्थिती निर्माण होऊन जळगावकरांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.
आगामी पाच दिवस वातावरण कसे राहणार…
दिनांक, तापमान आणि वातावरणाची स्थिती
२२ एप्रिल- तापमान ४४ अंश… कोरडे व उष्ण वातावरण राहणार
२३ एप्रिल – तापमान ४४ अंश … कोरड्या वातावरणासह उष्ण वारे वाहणार
२४ एप्रिल – तापमान ४३ अंश… कोरडे वातावरण राहणार
२५ एप्रिल- तापमान ४३ अंश… कोरडे वातावरण राहणार
२६ एप्रिल- तापमान ४४ अंश… कोरडे वातावरण राहणार