जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । विविध मागण्यांसाठी कुटुंबियांसह पारोळा तहसील कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेल्या महिलेला तहसीलदारांच्या वाहनाने धडक दिल्याची घटना मंगळवार दि.९ रोजी घडली. यात त्या महिलेला दुखापत झाल्याने त्यांना उपचारार्थ कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पारोळा शहरातील डी.डी. नगरातील रहिवासी नितीन वना पाटील हे पत्नी व मुलीसह गेल्या १६ दिवसापासून तहसील कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत. मंगळवार दि.९ रोजी सायंकाळी तहसीलदार अनिल गवांदे हे वाहनाने कार्यालयातून घरी जात असताना उपोषणाला बसलेल्या रंजनी पाटील यांनी त्यांच्या वाहनाला हात दाखवून गाडी थांबविण्याची विनंती केली. परंतु, वाहन जागेवर न थांबल्याने रंजनी पाटील यांना या वाहनाची धडस लागली. यावेळी त्या जमिनीवर कोसळल्याने त्यांना दुखापत झाली. तासभर त्या त्याच ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडून होत्या. त्यानंतर त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रंजनी पाटील यांना वाहनाने धाक दिल्याने व त्यात त्या जखमी झाल्यानंतरही तहसीलदार गवांदे यांनी वाहनातून खाली न उतरता व विचारपूस न करताच निघून गेल्याचा आरोप रंजनी पाटील यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.