चहा.. एकदा पिऊन तर पहा
जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । ‘जगात भारी चहा सोबत खारी’ असं जरी बोललं जात असलं तरी देखील चहाला कोणाच्या सोबतीची गरज पडत नसते. महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा जगभरात डोकेदुखीवर डॉक्टरांच्या सल्ल्यापेक्षाही महत्वाचा उपाय म्हणजे चहा. चहा फक्त डोकेदुःखीच पळवत नाही तर ताणतणावातून मुक्तता देखील देत असते. पाण्या नंतर जास्त पिला जाणारा पेय म्हणजेच चहा. चहा बद्दल जितकं बोलावं तितक एका चहाप्रेमीला कमीच वाटेल. बर पण आपण आज चहाबद्दल का बोलतोय? कारण आज आहे ‘जागतिक चहा दिन’ जो जगभरात १५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
चहा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सकाळ ची सुरवात हि चहा पिऊनच केली जाते असं म्हणायला हरकत नाही. काहींचा एक कप तर काहींच तीन कप चहाने देखील मन भरत नसत. जळगाव जिल्ह्यात देखील चहाच्या विक्रीने उच्चांक गाठला असून दररोज लाखोंची चहा प्रेमी रिचवत असतात. रोज चहा आवडीने पितात परंतु या चहाचा जन्म कुठं व कसा झाला हे अनेकांना माहित नसेल. तर चला जरा इतिहासात जाऊन बघूया चहा सर्वात आधी कोणी बनवला.
चहाला लाभला आहे प्राचीन संदर्भ
ख्रिस्तपूर्व 30 वे शतक ते ख्रिस्तपूर्व 21 वे शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागल्याचे सांगितले जाते. ख्रिस्तपूर्व 2737 मध्ये शेन नुंग हा चीनचा तेव्हाचा सम्राट होता. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर तो जंगलात राहत होता. दक्षिण चीनच्या दुर्गम भागात असताना एकदा तो एका औषधी वनस्पती असलेल्या झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पाने पडली. त्यामुळे पाण्याचा रंग आणि चवही बदलली. शेन नुंगला ते पाणी पिल्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चव खूप आवडली. पुढे त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी पिण्याची सवयच लावून घेतली. त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या परिसरात त्या रोपांचा शोध घेतला. हीच रोपे चहाची रोपे म्हणून नावारूपास आली आणि आजच्या चहाचा जन्म झाला.
आता भारत देशाचा विचार केला तर चहाला अंदाजे 200 ते 300 वर्षांचा इतिहास असल्याचे मानलं जातं. चहाचा मूळ उगम कोठे झाला? याबाबत अनेकांचे मतं भिन्न असले तरी जगाचा विचार केला तर चीन आणि त्यानंतर भारत या देशांमध्ये चहाला प्राचीन इतिहास असल्याचा इतिहासकारांचा दावा आहे. आपल्या शेजारी असलेला चीन या देशात चहाचा शोध लागल्याचे मानले जाते. चीन आणि भारतात प्राचीन काळापासून चहाचा व्यापार होत आहे. असे असले तरी चीनच्या लोकांचे आवडते पेय असलेला चहा आपल्या भारत देशात पोहचण्यासाठी 17-18 वे शतक उजाडावे लागले.
त्याला ब्रिटीश साम्राज्य कारणीभूत असल्याचे इतिहासकार सांगतात. ब्रिटिशांनी व्यापाराच्या उद्देशाने जगाचा प्रवास सुरू केला तेव्हा ते प्रत्येक देशातील संस्कृती, तेथील जीवनमानाचा जवळून अभ्यास करत असत. व्यापारासाठी भारतात आल्यावर त्यांनी शेजारील चीनची संस्कृती, तेथील लोकांची जीवनपद्धती देखील जाणून घेतली. तेव्हा ब्रिटिशांना चहाची माहिती झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी बरचं राजकारण केल्यानंतर चहा भारतात आणला. त्यानंतर काही वर्षांचा कालावधी उलटला. ब्रिटीश भारत सोडून गेले. परंतु, त्यांनी भारतात आणलेला चहा मात्र येथेच राहिला. आज चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे.
कोणत्या कंपनीने केलं उत्पादक सुरवात
19 व्या शतकात भारतात याचं उत्पादन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सुरु केलं. त्यासोबतच, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये पहिली चहाची बागही सुरु करण्यात आली. त्यानंतर चहाचं चलन वाढलं. आज देशातील अनेक भागांमध्ये चहाची शेती केली जाते. त्या आधी 16 व्या दशकापर्यंत लोकांनी चहाच्या पानांचा वापर भाजीच्या रुपात केला. तसेच, याला वाटून ते काळं पेय बनवून त्याचं सेवन करायचे.
इथे घेतले जाते चहाचे पीक
आज भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो.