जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । येथून जवळच असलेल्या तरसोद शिवारातील शेतात एका गोदाममध्ये बारदान ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास गोदामला अचानक आग लागली. ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू करताच जळगाव मनपा अग्निशमनदलाचे बंब पोहचले. ३ बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले.
राजेंद्र रामसिंग राजपुत (वय ४०) यांनी तरसोद येथील त्यांच्या शेतामध्ये बारदानाचे गोडाऊन तयार केले होते. तरसोद गणपती मंदिराजवळच असलेल्या या गोदामला सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास अचानक आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ जळगाव मनपा अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी ग्रामस्थांनी धावपळ करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी तरसोद गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. नशिराबाद पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नोंद करण्याचे काम सुरू केले होते.
दरम्यान, ही आग कशामुळे लागली आणि या आगीमध्ये किती रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला याची माहिती मिळाली नाही. मंगळवारी पंचनामा झाल्यानंतरच कळेल असे पोलिसांनी सांगितले. आगीत मोठे नुकसान झाले असून आकडा लाखोत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.