जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२६ । महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याच्या काही भागांत हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला असताना, दुसरीकडे मात्र जळगावात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात येत्या ८ मेपर्यंत हवामान अत्यंत उष्ण आणि कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे जळगावकरांना पुढील काही दिवस सूर्याच्या तीव्र प्रकोपाचा आणि उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे.

तापमान ४४ अंशांवर जाण्याची शक्यता
सोमवारी जळगावचे तापमान ४२.६ अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, येत्या २४ ते ४८ तासांत यात मोठी वाढ होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात पुढील काही दिवसांत कमाल तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे. उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे दुपारच्या वेळी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार असून, उन्हाची ही तीव्र लाट नागरिकांची कोंडी करणारी ठरणार आहे. सध्या वायव्य दिशेकडून ताशी १५ ते ३० किलोमीटर वेगाने उष्ण वारे (लू) वाहत असल्यामुळे हवेतील उष्णता प्रचंड वाढली आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. परिणामी राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, तिथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. मात्र, जळगावात ८ मेपर्यंत या भागात पावसाची अजिबात शक्यता नाही.९ आणि १० मे नंतर मात्र वातावरणात मोठा बदल दिसेल. या काळात आकाश ढगाळ होऊन स्थानिक पातळीवर पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल, ज्यामुळे वाढत्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.







