जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे भर दिवसा घरफोडी करीत चोरट्यांनी 58 हजारांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी झालेल्या घरफोडी प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील टाकरखेडा येथे विजय अजबराव पाटील हे कुटूंबासह वास्तव्यास असून सेंट्रींग काम करून ते कुटुंबाचा रहाटगाडा ओढतात. मंगळवारी सकाळी ते सेंट्रिग कामाला तर त्यांची पत्नी शेतात तसेच मुले शाळेत गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दुपारी दोन वाजता विजय यांच्या पत्नी घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घरातील 24 हजार रुपये किंमतीचे आठ ग्रॅम सोन्याचे काप, 21 हजार रुपये किंमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, 12 हजार रुपये किंमतीचे चार ग्रॅम सोन्याचे मणी व पेंडल, दिड हजार रुपये रोख असा एकूण 58 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहेत.