शनिवार, सप्टेंबर 16, 2023

जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला असून या व्यवसायात अनेक जण गुंतले आहे. यात पोलिसही मागे नसल्याने एक पोलीस कर्मचारी स्वतः वाळूचा व्यवसाय चालवीत असल्याचा प्रकार समोर पुढे आला.

जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यांचे वाळू माफियांशी संबंध असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी केली होती. यानंतर आता विश्वनाथ गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केली असून अशी माहिती आज पत्रकारांशी संवाद साधतांना दिली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळू माफियांना लगाम घालण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले असून त्यावर अमल सुरू केला आहे. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी पोलीस कर्मचारी विश्वनाथ गायकवाड विरोधात तक्रार केली.

दीपक गुप्ता यांनी केलेल्या तक्रारनुसार, तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यांचे वाळू माफियांशी अवैध आर्थिक संबंध देखील आहेत. तसेच अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर देखील घेतले आहे. इतकंच नव्हे तर दापोरा येथे त्यांनी ५० ब्रास वाळूचा ठिय्या मांडला आहे असा आरोप करत याबाबतची तक्रार विभागीय महसूल आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.

त्यांनतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पोलीस कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे विशवनाथ गायकवाड यांच्या कारनाम्यामुळे खाकी डागाळली असून काही तथा कथितांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान विश्वनाथ गायकवाड याचे कोणाशी आणि कोणकोणत्या व्यवसायात लागेबांधे आणि गुंतवणूक आहे, त्याच्या नावावर उप प्रादेशिक कार्यालय येथे चौकशी करून त्याच्या नावावर आणखी ट्रॅक्टर आहेत का? याबाबत चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले .